आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपुऱ्या पावसाने हळदीचे दहा टक्के उत्पादन घटण्याची भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तामिळनाडूकडे पावसाने सपशेल पाठ फिरवल्यामुळे येथील हळद उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले अाहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे राज्यातल्या हळद उत्पादकांमध्ये चिंता निर्माण झाली अाहे. गेल्या दाेन दिवसांपासून पाऊस सुरू झालेला असला तरी येणाऱ्या पंधरा दिवसांत पाऊस नियमित पडला नाही तर मात्र पिकांवर विपरीत परिणाम हाेऊन हळद उत्पादनात दहा टक्क्यांनी घट हाेण्याची भीती हळद उत्पादकांनी व्यक्त केली अाहे. 

मान्सूनला प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीच्या दहा दिवसांत चांगला पाऊस झाल्याने जमिनीत पुरेशा प्रमाणात पाणी अाहे. त्यामुळे सध्या गंभीर परिस्थिती नाही. परंतु सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने मात्र राज्यातल्या हळद उत्पादकांमध्ये अापल्या भागात पावसाची अावश्यकता असल्याची अाेरड सुरू झाली अाहे. गेल्या दाेन दिवसांपासून पाऊस सक्रिय झालेला असला तरी मराठवाड्यात अजूनही पावसाचे प्रमाण कमी अाहे. 

हळदीच्या उत्पादनासाठी पुढील १० ते १५ दिवस नियमित पाऊस पडण्याची गरज अाहे. अन्यथा सध्या लागवड झालेल्या हळद पिकाला धाेका निर्माण हाेऊन उत्पादन घटण्याची भीती सांगलीतील हळद व्यापारी मनाेहर सारडा यांनी व्यक्त केली. उभ्या पिकाची ताकद निघून जाईल. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात दाेन्ही मिळून २७-२८ लाख पाेती उत्पादन हाेते. परंतु ते यंदा १० टक्क्यांनी कमी हाेण्याची शक्यता अाहे. अाता पाऊस पडला तर तेवढीही घट राहणार नाही. पुढील दहा ते पंधरा दिवस हळद लागवडीसाठी महत्त्वाचे असल्याकडे सारडा यांनी लक्ष वेधले. 

हळदीची सर्वाधिक लागवड हाेणाऱ्या तामिळनाडूमध्ये पाऊस नसल्याने चिंतेचे वातावरण अाहे. परंतु राज्यात आठवडाभरात पावसाने चांगला जाेर धरला तरी फार माेठा परिणाम हाेणार नाही, असे मत कमॉडिटी तज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी व्यक्त केले. 

देशात ५५ लाख पाेत्यांचे उत्पादन
जुलै ते सप्टेंबर या दरम्यान चांगला पाऊस झाला तर हळदीचे पीक चांगले येते. ७० किलाेचे एक पाेते याप्रमाणे देशात दरवर्षी ६५ ते ७० लाख पाेत्यांचे उत्पादन हाेते. परंतु तामिळनाडूमध्ये पावसाने अाेढ दिल्यामुळे यंदा ५५ ते ६० लाख पाेती उत्पादन हाेण्याचा अंदाज सारडा यांनी व्यक्त केला. 

...तर उत्पादनात घट
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात दाेन्ही मिळून २७ ते २८ लाख पाेती उत्पादन हाेते. परंतु नियमित पाऊस न पडल्यास २०१८ वर्षातल्या हळद उत्पादनावर परिणाम हाेऊन ते १० टक्क्यांनी घटण्याची शक्यता अाहे. अजूनही २० दिवसांचा कालावधी असून यामध्ये जर पाऊस चांगला झाला तर तर तेवढीही घट राहणार नाही, असेही सारडा म्हणाले. 
 
राज्यात चांगला भाव 
देशात अांध्र प्रदेश (निझामाबाद), तामिळनाडू (इराेड, सेलम), पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात हळदीचे उत्पादन घेण्यात येते. ३० टक्के उत्पादन तामिळनाडूमध्ये हाेते. या राज्यात कमी पावसाचे तिसरे वर्ष असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली अाहे. यंदा तामिळनाडूमध्ये हव्या त्या प्रमाणात हळद लागवड झालेली नाही. तेथील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातून हळद खरेदी करण्यास सुरुवात केली अाहे. त्यामुळे राज्यातील हळदीला चांगला भाव मिळत अाहे.
बातम्या आणखी आहेत...