आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिया दत्तविरोधात फरहान आझमी, सपाचे काँग्रेसविरोधात मुस्लिम कार्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त यांच्याविरोधात समाजवादी पक्षाने अबू आझमी यांचे चिरंजीव फरहान यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसला मिळणारी मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते फोडण्यासाठीच सपाने हे कार्ड खेळल्याची चर्चा आहे. भाजपने येथून दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम यांना उमेदवारी दिली आहे. दत्त आणि महाजन जोडीत होणा-या दुरंगी लढत आता तिरंगी व अधिक रंजक ठरण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व व पश्चिम भागात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. ख्रिश्चन मतदारही लक्षणीय आहेत. त्यामुळे प्रिया दत्त यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. कारण या भागातील सर्व मराठी लोक महाजन यांना मतदान करण्याची शक्यता आहे. या बाबी प्रिया दत्तच्या विरोधात जात असतानाच काँग्रेस सरकारच्या खराब कामगिरी व भ्रष्टाचाराच्या मुद्याने सुज्ञ मतदार काँग्रेसपासून दुरावला जाणार आहे. अशा स्थितीत प्रिया दत्त यांना 2009 मध्ये मिळालेली मते टिकवणे अवघड आहे.
तीनही उमेदवारांचे नातेवाईक बॉलिवूडमध्ये- या मतदारसंघात बॉलिवूडची मंडळी मोठ्या प्रमाणात राहतात. ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त येथून काँग्रेसमधून निवडून येत. त्यांच्या निधनानंतर ही जागा प्रिया दत्त यांच्याकडे गेली. पोटनिवडणुकीत दत्त यांच्या सहानुभुतीवर सहज विजय मिळविल्यानंतरही 2009 साली प्रियाने आरामात विजय मिळविला होता. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा प्रियाला उमेदवारी दिली आहे. त्यातच तिचा भाऊ संजय दत्त बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याची ऊठबस बॉलिवूडमध्ये उच्च वर्तुळात आहे. त्यामुळे आजपर्यंत प्रियाला बॉलिवूडची एकगठ्ठा मिळत होती. फरहान आझमीची पत्नी आयेशा टाकिया ही अभिनेत्री आहे. त्यामुळे बॉ़लिवूडमधील अनेक स्टार्स फरहानच्या प्रचारात दिसू शकतील. यातील अनेक कलाकार मुस्लिम असल्याने ते फरहानच्या पारड्यात मत टाकल्यास नवल वाटू नये. पूनम महाजन यांचा भाऊ राहुल महाजन ही आघाडीचा नसला तरी टीव्ही मालिकेत त्याचे दर्शन होत असते. त्यामुळे दोन उमेदवाराचे भाऊ व तर एकाची बायको बॉलिवूडशी निगडीत आहे. आता प्रिया दत्तला मिळणा-या मतांत फूट होण्याची शक्यता आहे.