आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली राडा: \'भिडे गुरूजीच मिरज दंगलीचे सूत्रधार\'; जितेंद्र आव्हाडांवर हल्ल्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगलीत शिवजागर परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड... - Divya Marathi
सांगलीत शिवजागर परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड...
सांगली/मुंबई- मिरज येथे झालेल्या दंगलीचे मुख्य सूत्रधार शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हेच आहेत, असा घाणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी सांगलीत केला. पुरोगामी विचारांचे वारसदार असलेल्या सांगली जिल्ह्यात भाजपचे आमदार कसे निवडून येतात असा सवाल करीत राज्य सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा अशी मागणीही आव्हाड यांनी केली. दरम्यान, आव्हाड बोलत असतानाच शिवप्रतिष्ठानच्या 8-10 कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटात हाणामारी झाली. आमदार आव्हाड यांच्या गाडीची काच फोडण्यात आली.
बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यभर शिवसन्मान जागर परिषदेचे आयोजन केले जात आहे. सांगलीत काल (रविवारी) सायंकाळी पटेल चौकातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित शिवसन्मान जागर परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास आव्हाड यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली. आव्हाड यांनीही टीकेचा स्वर कायम ठेवला. त्याचवेळी सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आमदार आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने व्यासपीठाकडे धाव घेतली. त्यावेळी शिवजागरच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मज्जाव केला. यादरम्यान या दोन्ही गटात धुमचक्री झाली. यात 10 जण जखमी झाले. पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हुसकावून लावले. त्यानंतर त्यांनी बाहेर आव्हाडांच्या गाडीवर दगडफेक केली. घटनेनंतर 20-25 मिनिटांनी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला व आव्हाड यांनी आपले राहिलेले भाषण पूर्ण केले.
आव्हाड म्हणाले, सांगली जिल्ह्याला पुरोगामी विचाराचा मोठा वारसा आहे. क्रांतिसिह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जीडी बापू लाड, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्यासारख्या समाजधुरिणींनी जिल्ह्यात व महाराष्ट्रात पुरोगामी विचाराची मोट बांधली. पण आज सांगलीत भिडे प्रवृती वाढीस लागली आहे. कारण गेल्या 20-25 वर्षात महाराष्ट्रातून सत्यशोधक, पुरोगामी, दलित चळवळी हद्दपार होऊ लागल्या आहेत. तर, दुसरीकडे बजरंग दल, सनातन, विश्वहिंदू परिषद यासारख्या हिंदुत्त्ववादी संघटनांची ताकद वाढू लागली आहे. आम्ही ब्राम्हणांच्या विरोधात नसून, ब्राह्मणवादाच्या विरोधात वैचारिक वाद घालत आहोत. पण विचारांचा प्रतिवाद विचारानेच करण्याची त्यांच्यात हिम्मत नाही. त्यामुळेच दाभोलकर, पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी कार्यकर्त्यांचे खून पाडले जात आहेत.
...म्हणून दादोजी कोंडदेव यांनी आत्महत्या केली -
आव्हाड म्हणाले, दादाजो कोंडदेव, रामदास हे शिवरायांचे कधीच गुरु नव्हते. पण बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास सांगून ते ठसविण्याचा प्रयत्न केला. हिंदू-मुस्लिम द्वेष पसरविण्यासाठी शिवरायांचा वापर करण्यात आला. दादोजी कोंडदेव यांनी शिवरायांच्या कामगिरीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. शिवरायांचे कर्तृत्व सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली, असेही आव्हाडांनी सांगितले.
तिकडे सांगली बंद तर मुंबईत स्थगन प्रस्ताव दाखल-
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगली बंदची हाक दिली आहे. तर, मुंबईत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला आहे. विधीमंडळात आव्हाडांच्या राड्यावरुन विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दाखल केला आहे. सरकार यावर आता काय उत्तर देते याकडे लक्ष राहील.
पुढे वाचा व छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, या संबंधीतील घटना...
बातम्या आणखी आहेत...