आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा बांधकामावर स्वत:हून गुन्हे नोंदवा, उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता अनधिकृत बांधकामांसाठी जबाबदार असलेल्या बिल्डरांवर पोलिसांनी स्वत:हून गुन्हे नोंदवून कारवाई करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना सोमवारी दिले. न्यायमूर्ती ए. एस. ओक आणि व्ही. एल. आंचलिया यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली.

नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांविरोधात राजीव मिश्रा आणि मयूरा मारू यांनी याचिका दाखल केली आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची बाजू तपासून कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले होते. सोमवारी पोलिसांच्या वकील मोलिना ठाकूर म्हणाल्या, बेकायदा बांधकामांबाबत आतापर्यंत दोन तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार सहा बिल्डर आणि दोन एजंटांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात सिडकोने अधिकृत तक्रार नोंदवावी, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, ‘लोकांच्या तक्रारींची वाट का पाहता? तुम्ही स्वत:हून कारवाई का करत नाही. पोलिसांना जेथे अनधिकृत बांधकाम झाल्याचे माहीत असेल तर त्यांनी स्वत:हून कारवाई केलीच पाहिजे. ’

कारवाईत योग्य कलम लावावेत
बेकायदा बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांनी योग्य कलम लावल्यास, ज्या लोकांनी पाडण्यात आलेल्या अशा बेकायदा इमारतीत फ्लॅट खरेदी केले आहेत, अशांना त्यांचे पैसे परत मिळू शकतील, असेही न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले. या प्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.