आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी दारूकांडप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवू द्या, पोलिसांनी मागितली दंडाधिका-यांकडे परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मालवणी येथील विषारी दारूकांडातील १०४ जणांच्या मृत्यूस जबाबदार आरोपींवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न या दोन गुन्ह्यांची कलमे लावण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुंबई पोलिसांनी महानगर दंडाधिका-यांकडे शुक्रवारी केली.

दरम्यान, न्यायालयाने अशी परवानगी दिल्यास अशा प्रकरणांत हत्येचा गुन्हा नोंदवला जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.मालवणी विषारी दारूकांडात आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मुंबई पोलिसांनी हालचालींना सुरुवात केली आहे. शुक्रवारी दुपारी या प्रकरणाचा तपास करणा-या गुन्हे शाखेच्या पथकाने महानगर दंडाधिका-यांकडे भादंविच्या कलम ३०२ म्हणजेच हत्या आणि कलम ३०७ म्हणजे हत्येचा प्रयत्न या दोन कलमांचा समावेश करण्याची परवानगी मागितली आहे.

मालवणी दारूकांडातील मृतांचा आकडा आणि घटनेचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींवर हत्येचे गुन्हे दाखल करण्याबाबतचे सूतोवाच अगोदरच केले होते. अशा प्रकारचे अवैध धंदे करणा-यांना चांगली जरब बसावी हा हेतू यामागे आहे. त्याचबरोबर ही कलमे लावण्यायोग्य परिस्थितीजन्य पुरावेही असल्याची माहिती तपास पथकातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली. आरोपींना आपण मिथेनाॅलसारख्या विषारी पदार्थांची विक्री करत असल्याची पूर्ण कल्पना असतानाही त्यांनी त्याची विक्री केली. त्यामुळेच हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.

ही कलमे लावल्यानंतर ती न्यायालयाच्या कसोटीवर टिकतील का, याचा अंदाज घेण्यासाठी पोलिस खात्याने राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाचाही सल्ला घेतला होता. या विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नऊ जण अटकेत
आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली असून यात दोन महिलांचा समावेेश आहे. यातील किशोर पटेल याला अगोदरच कलम ३०४ सदोष मनुष्यवध आणि ३२८ सारखी कलमे लावण्यात आली आहेत. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार अातिक याला पाेलिसांनी दिल्लीतून अटक केली हाेती. ताे गुजरात सीमेवरून विषारी गावठी दारू अाणून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पुरवत असल्याचे समाेर अाले अाहे. त्यामुळे अातिक याच्या तस्करी करणा-या टाेळीमागे अन्य कुणाकुणाचा सहभाग अाहे याचाही पाेलिस तपास करत अाहेत. त्या सर्वांवर कठाेर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू अाहेत.