आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडेंची 'संघर्षयात्रा' पडद्यावर, ११ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऊसतोड कामगाराचा मुलगा ते देशाचा ग्रामविकासमंत्री अशी झेप घेणाऱ्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरील "संघर्षयात्रा' हा चित्रपट ११ डिसेंबर रोजी राज्यभर प्रदर्शित होत आहे. मुंडेंचा जन्मदिवस १२ डिसेंबरला असल्याने त्याच्या आदल्या दिवशी हा चित्रपट पडद्यावर आणून ओम सिद्धिविनायक मोशन पिक्चर्स व भाजप चित्रपट युनियनतर्फे या दिग्गज नेत्याला आदरांजली वाहिली जाईल. राज्यातील १५० सिनेमागृहांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, असे निर्मात्यांनी सांगितले.

संघर्ष यात्रा सिनेमात अभिनेता शरद केळकर हा गोपीनाथ मुंडेंच्या भूमिकेत दिसणार आहे, तर श्रुती मराठे पंकजा मुंडेंची भूमिका करत आहेत. ओमकार कर्वे हे प्रमोद महाजनांच्या भूमिकेत दिसणार असून प्रीतम कागणे या प्रीतम मुंडे साकारतील. साकार राऊत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शित केले असून चित्रपटाची कथा, पटकथा व संवादाची जबाबदारी विराज मुळ्ये व विशाल घार्गे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, औरंगाबाद, भगवानगड या परिसरात झाले आहे. कथा, अभिनय, तांत्रिक बाबींद्वारे चित्रपट अधिक वास्तववादी करण्याचा प्रयत्न केला आहे.

सूर्यकांत बाजी, मुकुंद कुलकर्णी, राजू बाजी आणि संदीप घुगे हे या चित्रपटाचे निर्माते असून संदीप घुगे हे भाजप चित्रपट युनियनचे अध्यक्षही आहेत. सुमारे सव्वातीन कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट तयार करण्यात आला असून गोपीनाथरावांच्या संघर्षयात्रेमधून राज्यातील तरुणांना निश्चित प्रेरणा मिळेल, असा विश्वास निर्माते संदीप घुगे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे गाणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या चित्रपटात गाणे गायले असून त्यांचे हे पहिलेच पार्श्वगायन आहे. सिनेमात दोन गाणी असून दुसरे गाणे हे आदर्श शिंदेंचे आहे. मंदार चोणकर, शाहीर मोरेश्वर मेश्राम यांनी लिहिलेल्या गीतांना श्रीरंग युऱ्हेकर व अनिरुद्ध जोशींनी संगीत दिले आहे.
आज गोपीनाथराव हवे होते
चित्रपटाची संकल्पना गोपीनाथरावांच्या हयातीतच त्यांच्यासमोर मांडण्यात आली होती. सर्व माहिती नीट जाणून घेतल्यानंतरच त्यांनी याला मान्यता दिली. आपल्या संघर्षमय जीवनावरील चित्रपट बघायला ते हवे होते. आमच्या मेहनतीचे चीज म्हणून त्यांनी व्वा... असे बोलत पाठीवर मारलेली थापेसाठी आम्ही उत्सुक होतो. पण, ते आमच्या नशिबी नव्हते. आज त्यांना आदरांजली म्हणून प्रदर्शित करावा लागतो. मुंडेंच्या संघर्षयात्रेतून तरुण प्रेरित झाल्यास आमच्या कष्टाचे चीज झाले असे वाटेल, अशा भावना घुगेंनी व्यक्त केल्या.