आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: डिजिटल प्रिंटमुळे चित्रपट पायरसी घटली; इंटरनेटमुळे बॉलीवूडच्या व्यवसायात वृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या अनेक वर्षांपासून पायरसीमुळे संकटात सापडलेल्या बॉलीवूडला डिजिटल प्रिंटमुळे जीवनदान मिळाले आहे. डिजिटल प्रिंटमुळे निर्मात्याच्या खर्चात बचत होत असतानाच पायरसी कमी होऊन इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे कमाईतही वाढ होत आहे. डेलॉइटने सप्टेंबरमध्ये सादर केलेल्या अहवालात ही बाब स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. देशात डिजिटल प्रिंटची सुरुवात करणऱ्या यूएफओ मूव्हीजचे एमडी आणि सीईओ संजय गायकवाड यांनीही पायरसी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे सांगितले. पायरसी कमी होत असल्याने २०२० मध्ये बॉलीवूडचा व्यवसाय २३,८०० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.  

वर्षाला सर्वाधिक चित्रपट बॉलीवूडमध्ये निर्माण होतात. भारतात वर्षाला साधारण १५०० ते २००० चित्रपट  तयार होतात. यात ४३ टक्के वाटा हिंदी चित्रपटांचा आहे.  तेलुगु १९ टक्के, १७ टक्के तामिळ, तर आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा वाटा ७ टक्के आहे. उर्वरित वाटा अन्य भाषिक चित्रपटांचा आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटांचा ४२ टक्के व्यवसाय पायरसी चित्रपट खात होते. चित्रपटांची पायरसी करणाऱ्या १०० पेक्षा जास्त वेबसाइट असून त्यांची वार्षिक कमाई ३५०० कोटी आहे.  पायरसीमुळे २०१६ मध्ये  बॉलीवूडचे १८ हजार कोटी बुडाले होते. मोठे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वेबसाइटवर येत असल्याने निर्मात्यांचे नुकसान होत होते. उडता पंजाब, कबाली, दिलवाले, मांझी द माउंटन मॅन आदी चित्रपट प्रदर्शनापूर्वी बाजारात उपलब्ध होते. ग्रेट ग्रँड मस्ती तर १७ दिवस अगोदरच बाजारात उपलब्ध झाला होता. बाहुबली-२ ही प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मोबाइलवर उपलब्ध झाला होता. चित्रपटगृहात मोबाइलने शूट करून पायरेटेड कॉपी बाजारात आली होती. परंतु आता डिजिटल प्रिंटमुळे पायरसी कमी होण्यास मदत झाली आहे.  

यूएफओ मूव्हीजचे संजय गायकवाड यांनी सांगितले, पूर्वी पायरसी मोठ्या प्रमाणावर होत होती. प्रेक्षकांच्या घराजवळ चित्रपटगृह नसल्याने पायरेटेड कॉपीवर चित्रपट पाहिला जात असे. परंतु आता टायर-२ आणि ३ मध्ये मल्टिप्लेक्स सुरू झाल्याने प्रेक्षकांची सोय झाली आहे. त्यातच आम्ही डीसीपी-केडीएम डिजिटल सिनेमा पॅकेज-की डिलिव्हरी मेसेजद्वारे प्रिंट तयार करत असल्याने पायरसी कठीण झाली आहे. हार्ड डिस्क किंवा पेनड्राइव्हमध्ये एनक्रिप्टेडच्या माध्यमातून चित्रपट लोड करून त्याला पासवर्ड दिला जातो. चित्रपट कुठे किती वाजता दाखवायचा हे ठरवले जाते आणि त्यानुसार की-वर्ड दिला जातो. त्यामुळे चित्रपट कुठे किती वेळा दाखवला जातोय हे स्पष्टपणे समजते. यामुळे निर्मात्याच्या खर्चातही बचत झाली आहे. संपूर्ण देशभरात पाच हजारच्या वर चित्रपटगृहांत आधुनिक डिजिटल प्रोजेक्शन यंत्रणा लावली आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे निर्मात्याच्या व्यवसायात चांगलीच वाढ झाली आहे. ४ जीमुळे चित्रपट डाऊनलोड मोठ्या प्रमाणावर केले जातात. त्यामुळे निर्मात्याला पैसे मिळतात. चांगला चित्रपट असला की प्रेक्षक चित्रपटगृहातही जाऊन पाहतात.  

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये डेलॉइटने भारतीय चित्रपटसृष्टीबाबत तयार केलेल्या अहवालातही डिजिटल प्रिंटमुळे पायरसी कमी झाल्याचे स्पष्ट केले आहे. डिजिटल वितरणामुळे एकाच वेळी चित्रपट अनेक ठिकाणी प्रदर्शित होत असल्याने पायरसी होत नाही.   

सेन्सॉर बोर्डाकडे गेलेल्या प्रिंट लीक होऊन चित्रपटांची पायरसी होते, असे म्हटले जाते. त्यामुळे माजी सेन्सॉर बोर्ड प्रमुख पहलाज निहलानी यांनी डिजिटल प्रिंट सादर करावी, असे सर्व निर्मात्यांना सांगितले होते. त्यानुसार सर्वप्रथम साजिद नाडियादवाला यांनी ढिशूमची डिजिटल प्रिंट बोर्डाकडे पाठवली होती.  

डेलॉइट आणि संजय गायकवाड पायरसी कमी झाली असे म्हणत असले तरी मुकेश भट्ट यांना मात्र हे मान्य नाही. मुकेश भट्ट यांनी सांगितले, इंटरनेटमुळे उलट पायरसी वाढली आहे. आता तर मोबाइलवरही पायरेटेड चित्रपट पाहिले जाऊ लागले आहेत. पायरसी बंद करण्याचे काम सरकारचे आहे.   सरकारकडे आयटी सेल आहे, आयटी तंत्रज्ञ आहेत, त्यांनी पायरसी करणाऱ्या वेबसाइटवर बंदी घातली पाहिजे, असे मत मुकेश भट‌्ट यांनी व्यक्त केले. 

चित्रपटगृहांची संख्या अमेरिकेच्या तुलनेत कमी  
देशात एक लाख नागरिकांमागे ६ चित्रपटगृहे आहेत. चीनमध्ये हे प्रमाण २३ आहे, तर अमेरिकेत १२६ चित्रपटगृहे प्रति एक लाख नागरिकांमागे आहेत. त्यामुळे बॉलीवूड सगळ्यात जास्त चित्रपट तयार करत असला तरी त्यांचा व्यवसाय हा हॉलीवूडच्या व्यवसायाच्या ११ बिलियन डॉलरच्या तुलनेत फक्त २.१ बिलियन डॉलर इतका नगण्य आहे.  

मराठी चित्रपट व्यवसाय वाढला  
डेलॉइटच्या अहवालानुसार कमी बजेटमध्ये चांगले आणि दर्जेदार चित्रपट तयार होण्याचे प्रमाण मराठीत वाढले आहे. बॉलीवूडचे कलाकार, निर्मातेही मराठी चित्रपट तयार करू लागले आहेत. २०१५ मध्ये मराठी चित्रसृष्टीच्या व्यवसायात ४० ते ४५ टक्के वाढ होऊन व्यवसाय १.५ अब्ज रुपये झाला. अक्षयकुमार, रिलायन्स, इरॉस, डिस्ने, व्हायकॉम १८, फॉक्स स्टार प्रादेशिक चित्रपटासाठी त्यांच्या वार्षिक बजेटपैकी २० टक्के रक्कम खर्च करू लागले आहेत. मल्टिप्लेक्समध्ये एक शो लावण्याचा नियम आणि महाराष्ट्र सरकार करत असलेली मदत त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीची वाढ झाली आहे.

भारतीय चित्रपटांचा वार्षिक व्यवसाय  
२०१३ : १२,५०० कोटी रुपयांचा व्यवसाय. 
२०१४ : तो फक्त १०० कोटींनी वाढला आणि १२,६०० वर पोहोचला. त्यानंतर मात्र त्यात वाढ होत गेली. 
२०१५ : १३,८०० कोटी, गेल्या वर्षी म्हणजे 
२०१६ : १५,५०० कोटी व्यवसाय झाला.
२०१७ : १७,३०० कोटींचा व्यवसाय होईल, अशी शक्यता आहे. वर्षाला १०.५ टक्क्यांनी वाढ होऊन चित्रपटांचा व्यवसाय आहे.
२०१८ : १९,३०० कोटी. 
२०१९ : २१,४०० कोटी.
२०२० : बॉलीवूडचा व्यवसाय २३,८०० कोटींवर जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  
बातम्या आणखी आहेत...