आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Filmmakers Relieved As Sanjay Dutt Gets Extension

खलनायक संजयला मुदतवाढ; बॉलिवूडचा जीव पडला भांड्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने 1993 मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी सुनावण्यात आलेल्या शिक्षेबाबत शरणागती पत्करण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ दिल्याने त्याच्यासोबत चित्रपट करत असलेल्या अनेक दिग्‍दर्शक व निर्मात्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

बुधवारी संजय दत्तच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून त्याला चार आठवड्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे 19 मे रोजी कोणत्याही परिस्थितीत त्याला शरणागती पत्करावी लागणार आहे. संजयचे सध्या अनेक चित्रपट प्रलंबित आहेत. सर्व चित्रपट पूर्ण करण्यासाठी त्याने सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. मात्र, सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने त्याला चार आठवडे मुदतवाढ दिली. संजयकडे सध्या ‘पीके’, ‘जंजीर’, ‘पोलिसगिरी’, ‘उंगली’, ‘द्वंद’ आणि इतर काही चित्रपट आहेत. यातील बहुतांश चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. संजय करत असलेल्या एकूण चित्रपटांचे बजेट हे 278 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे तो आधी सर्व चित्रपट पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. ‘पोलिसगिरी’ चित्रपटासाठी त्याला आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक टी. पी. अग्रवाल यांनी सांगितले.

संजयला मुदतवाढ मिळाल्याने आम्ही चित्रपट लवकर पूर्ण करू शकू. मात्र, त्याला आणखी तीन महिन्यांचा अवधी मिळाला असता तर आणखी बरे झाले असते, असेही अग्रवाल म्हणाले.

‘मुन्ना भाई चले दिल्ली’ लटकणार
दिग्दर्शक राजू हिराणी यांच्यासोबत संजयने ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ हे हिट चित्रपट केल. या सिरीजचा तिसरा भाग ‘मुन्ना भाई चले दिल्ली’ या चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली. मात्र, संजय तुरुंगात गेल्यास हा चित्रपट चार वर्षे लटकण्याची शक्यता आहे.