आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finally Shivsena Set Up Balasaheb Thakare's Memorial At Shivaji Park

‘शिवतीर्थ’वर अखेर शिवसेनेची वहिवाट पडलीच, राजकीय नेते, शिवसैनिकांची शिवाजी पार्कवर मांदियाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - खेळांसाठी राखीव असलेल्या शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होऊ नये यासाठी काँग्रेस-राष्‍ट्रवादीने हरत-हेने प्रयत्न केले, परंतु अनंत अडचणीतून मार्ग काढत पालिकेतील शिवसेना पदाधिका-यांनी या मैदानावर छोटेखानी का होईना पण स्मृतिस्थळ उभारण्यात यश मिळवलेच. त्यामुळेच पहिल्या स्मृतिदिनाला माथा टेकवण्यासाठी शिवसैनिकांना हक्काची जागा मिळू शकली.
रविवारी सकाळी सर्वप्रथम राज्यपाल के. शंकरनारायणन, बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्‍ट्रवादीचे केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांचे आगमन झाले. लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, राजीवप्रताप रुडी, देवेंद्र फडणवीस, अतुल शहा, अ‍ॅड. आशीष शेलार, भाई गिरकर आदी भाजप नेत्यांची मोठी फौजच मैदानावर आली होती. महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केले. ‘व्हिडिओकॉन’चे वेणूगोपाल धूत, ‘झी’चे सुभाषचंद्र गोयल, उद्योगपती राहुल बजाज, अभिनेता विवेक ओबेरॉय, मिलिंद गुणाजी आणि‘ऑर्किड’चे विठ्ठल कामत यांनी स्मृतिस्थळावर फुले वाहिली. राज्यभरातील आलेल्या तमाम शिवसैनिक व मान्यवरांच्या अभिवादनाचा स्वीकार करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस चौथ-याजवळ उपस्थित होते. बाळासाहेबांची बहीण संजीवनी करंदीकर, स्नुषा स्मिता ठाकरे, त्यांचे दोन्ही पुत्रही स्मृतिस्थळावर होते.