आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार: NCP आमदार कदम फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमेश कदम (फाईल फोटो) - Divya Marathi
रमेश कदम (फाईल फोटो)
मुंबई- अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळातील कथित गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांनी बोरिवली पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच रमेश कदम अटकेच्या भीतीने फरार झाले आहेत. फरार झालेल्या कदमांना पकडण्यासाठी सोलापूर पोलिसांनी शहराची नाकेबंदी केली असून त्यांचा कसून शोध सुरु आहे. सीआयडीचे पथकही सोलापूरमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी आमदार रमेश कदम यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्या भ्रष्ट आमदारांविरोधात आक्रमक झाले असून रमेश कदम यांच्यावरील कारवाई ही त्याचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. रमेश कदम हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.
रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी महामंडळात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा आरोप विधानसभेत भाजपचे आमदार संजय कुटे यांनी केला होता. तसेच रमेश कदम यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणीही भाजपच्या सदस्यांनी केली होती. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी अधिवेशन चालू असेपर्यंत चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार राज्य गुन्हा अन्वेषण पोलिसांनी रविवारी रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे बोरिवली पोलिसांनी सांगितले.
रमेश कदम यांच्यावर गुन्हा नोंदवल्याची बातमी कळताच मोहोळ व सोलापूरमधील राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. रमेश कदम यांना निवडून देऊन आम्ही चूक केली. कदमांनी राजीनामा देऊन पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवून दाखवावी असे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. मोहोळचे माजी राजन पाटील यांनीही रमेश कदम यांच्यापासून फारकत घेतली आहे. तर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी कदमांविरोधात आघाडीच उघडली आहे.
अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचे ढोबळे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात रमेश कदम यांनी 20-25 इनोव्हा महागडी कार पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटल्याचाही आरोप ढोबळे यांनी केला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी आपल्याला मिळालेली इनोव्हा गाडी परत करायला तयार असल्याचे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...