आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भवाद्यांची पत्रपरिषद उधळण्याचा प्रयत्न, मनसे कार्यकर्त्यांची चटप यांना धक्काबुक्की

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मुंबईत आयोजित केलेली पत्रकार परिषद घोषणाबाजी आणि विदर्भवादी नेत्यांना धक्काबुक्की करीत उधळण्याचा प्रयत्न मनसेने केला. मात्र परिषद घेण्याच्या भूमिकेवर आयोजक ठाम राहिल्याने व पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे नंतर ही पत्रकार परिषद सुरळीत पार पडली.

स्वतंत्र विदर्भाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईतील प्रेस क्लबमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यास सुरुवात करताच मनसे नेते अमेय खोपकर, मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे, नगरसेवक संतोष धुरी आणि शाखाध्यक्ष शशांक नागवेकर यांनी घोषणाबाजी करीत सभागृहात प्रवेश केला. ‘ही पत्रकार परिषद बंद करा. हा अखंड महाराष्ट्र आहे. येथे तुमची भूमिका मांडू नका. तुम्हाला काय बोलायचे ते विदर्भात जाऊन बोला. त्याचे परिणाम वाईट होतील. आम्ही तुमच्या वयाचा मान ठेवत आहोत. अखंड महाराष्ट्रासाठी १०६ हुतात्मे झाले आहेत. आम्ही महाराष्ट्राचा लचका आता तोडू देणार नाही,’ असा इशारा देत परिषद बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या या इशाऱ्याला विदर्भवाद्यांनी प्रत्युत्तर दिले. ‘विदर्भात नक्षलवादी सतत हल्ले करत आहेत. आतापर्यंत ९८४जणांचा बळी गेला आहे. हे सारे लोक मराठीच होते. तेव्हा तुम्ही कुठे होता? आजवर हजारो शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत, तेव्हा तुम्ही कधी त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेला आहात काय?’’ अशा शब्दात या समितीचे नेते आणि माजी आमदार वामनराव चटप यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र मनसेचे नेते अापल्या भूमिकेवर ठाम हाेते. ‘तुम्ही आता पत्र परिषद घेऊ शकणार नाही’, असे म्हणत चित्रपट सेनेचे अमेय खोपकर हे चटप यांच्या अंगावर धावून गेले. त्यांचेच अनुकरण करीत आणखी एक मनसे कार्यकर्ता माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे यांच्या अंगावर धावून गेला. तेवढ्यात पत्रकारांनी ‘हे सारे नेते वयोवृद्ध आहेत, त्यांच्या वयाचा तरी मान राखा,’ असे सुनावल्यानंतर नगरसेवक देशपांडे यांनी खोपकर आणि अन्य एका कार्यकर्त्याला रोखले. मात्र तरीही मनसैनिकांनी व नेत्यांनी विदर्भवादी नेत्यांना धक्काबुक्की करत पत्रकार परिषद तत्काळ बंद करा अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला. तसेच ‘राज ठाकरे जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद’ अशा घोषणा देणे सुरू केले. मात्र वामनराव चटप, खांदेवाले, माजी राज्यमंत्री रमेश गजबे, माजी मुख्य विक्रीकर आयुक्त धनंजय धार्मिक, महिला आघाडीच्या अध्यक्षा नंदा पराते या काेणत्याही परिस्थितीत पत्रकार परिषद घेण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्या.
पत्रकार परिषद झालीच
सुमारे २० मिनिटे मनसे कार्यकर्त्यांचा गाेंधळ सुरू हाेता. त्यानंतर घटनास्थळी अालेल्या पाेलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर मात्र पुढील एक तास पत्रकार परिषद सुरळीतपणे पार पडली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...