आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Day Declare Academic Schedule, Vinod Tawade Notice To Universities

पहिल्याच दिवशी जाहीर करा शैक्षणिक वेळापत्रक, तावडे यांची विद्यापीठांना सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील सर्व विद्यापीठांचे शैक्षणिक वेळापत्रक हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या दिवशीच विद्यापीठांनी प्रसिद्ध करावे, जेणेकरून विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश कधी होणार, परीक्षा कोणत्या दिवशी होणार, वर्षामध्ये विद्यापीठाचे कोणते उपक्रम असतील याची माहिती वेळापत्रकानुसार मिळेल. तसेच हे शैक्षणिक वेळापत्रक सर्वच विद्यापीठांनी समान ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे सर्वच विद्यापीठांच्या वेळापत्रकामध्ये समानता येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठांच्या कामाचा आढावा घेतला तसेच आगामी काळात या विद्यापीठांचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसदर्भात सविस्तर चर्चा केली.

राज्यातील सर्व विद्यापीठांनी शैक्षणिक दिनदर्शिका (अकॅडेमिक कॅलेंडर) तयार करावे, यामुळे प्रवेश प्रक्रिया व परीक्षा पद्धतीत सुसूत्रता अाणणे साेपे जाईल. राज्य सरकारतर्फे या कामासाठी ३ ते ४ सदस्यांची देखरेख समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती राज्यातील सर्वच विद्यापीठांनी तयार केलेल्या वेळापत्रकाच्या कार्यक्रमाचा दर तीन महिन्यांनी आढावा घेईल. तसेच या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे भविष्यात सर्व विद्यापीठांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकामध्ये एकसमानता येईल व विद्यार्थ्यांच्या तक्रारी राहणार नाहीत, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

कायद्यात दुरुस्तीसाठी तज्ज्ञ, विद्यार्थ्यांशी चर्चा
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मध्ये दुरुस्ती करणे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने सर्व विद्यापीठांचे प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी संघटना यांच्याशी चर्चा करण्यात येईल. याबाबत परिसंवाद आयोजित करण्यात येईल. त्यानंतरच या कायद्यामधील प्रस्तावित दुरुस्ती हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असेही तावडेंनी सांगितले.

विदेशी विद्यापीठांशी करारासाठी टास्क फोर्स
परदेशातील विद्यापीठ, महाविद्यालये व राज्यातील विद्यापीठांमध्ये करार करण्यासाठी लवकरच टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल. या टास्क फोर्सच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असेही या बैठकीत ठरवण्यात आले. तसेच या वेळी चॉइस बेस क्रेडिट सिस्टिम आणि रुसा आदी विषयांवरही कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली.