आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Discussed With Sharad Pawar, Nitin Gadkari, Then Sir Bent

कोणताही पर्याय नसल्याने मनोहर जोशींचा माफीनामा देऊन 'मोतीश्री'समोर लोटांगण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था झाल्यानेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी माफीनामा देऊन ‘मातोश्री’समोर लोटांगण घातल्याचे पक्षातील एका नेत्याने सांगितले. अपमान झाला तरी चालेल, पण शिवसेनेशिवाय भविष्यात तरणोपाय नाही, अशी चर्चा पक्षाबाहेर व आत ‘ऐकून’ खात्री झाल्यानंतरच जोशींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आपले प्रमुख असल्याचे मान्य केले.
दसरा मेळाव्यात अपमानित होऊन बाहेर पडलेल्या जोशींनी नंतरच्या काही दिवसांमध्ये शरद पवार तसेच नितीन गडकरी या नेत्यांची भेट घेऊन राजकीय भविष्याची चाचपणी केली. दोन्ही नेत्यांनी जोशींना शिवसेना हाच उत्तम पर्याय असल्याचे सुनावले. तर ‘मातोश्री’वर झालेल्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतही ‘तुम्हाला काय मिळाले नाही हे सांगा, मग पुढचे बोला...’ असे खडे बोल ऐकावे लागल्यानंतर सरांचा हात माफीनामा लिहिता झाला.
शिवसेनेबाहेर दोन महिने राहून जोशी सरांनी आपल्या अस्तित्वाबद्दल चाचपणी करण्याचा एकही मार्ग सोडला नाही, असे या नेत्याचे म्हणणे आहे. या चाचपणीत त्यांनी पवार व गडकरी यांची घेतलेली भेट तर जगजाहीर होती. या भेटीतही या दोन्ही नेत्यांनी सरांना सबुरीचा सल्ला दिला. या वेळी राष्‍ट्रवादी काँगे्रस व भाजपमध्ये आपल्याला काय स्थान मिळू शकेल, याची सरांनी खात्री करून घेतली होती. दोन्ही पक्षांमध्ये दिग्गज नेते असताना नव्याने पक्ष प्रवेश करून आपल्या हाती काही लागणार नाही, याचा त्यांना अंदाज आला, असे या नेत्याचे म्हणणे आहे.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तातडीने वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. सरांनाही निरोप गेला. जोशींना निमंत्रित केल्याने इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र या बैठकीत उद्धव यांनी शिवसेनेच्या नेत्यांना पक्षाच्या सद्य:स्थितीबद्दल बोलण्यास सांगितल्यानंतर उपस्थितांनी एका सुरात जोशींना खड्या आवाजात सुनावले. राज्याचे मुख्यमंत्री ते लोकसभेचे अध्यक्ष अशी सर्वोच्च पदे मिळूनही तुम्ही नाराज असाल तर सामान्य शिवसैनिकांनी काय करायचे? असे सरांना ऐकावे लागले, अशी माहिती या बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या या ज्येष्ठ नेत्याने दिली.
या बैठकीत शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले नाराज होऊन मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा झाली. जोशी व रावले यांचे संदर्भ डोक्यात ठेवून मग बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी ‘शिवसेना सोडून ज्यांना जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे’, असे स्पष्ट शब्दात सुनावल्यानंतर जोशी खडबडून जागे झाले आणि त्यांनी ताबडतोब माफीनामा देत मातोश्रीसमोर लोटांगण घातले, अशी माहिती नेत्याने दिली.
पंतांचे फायद्याचे गणित
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित सरकारांविरोधात निकाल गेला तर पदरात काहीतरी पडू शकते. पक्षातील वरिष्ठ, भाजप व इतर पक्षांमधील आपले संबंध पाहता ‘मातोश्री’कडून आपला निश्चितच विचार होईल. याशिवाय राज्य तसेच देशभरात व्यावसायिक चातुर्याच्या जोरावर उभारलेले आपले उद्योग भविष्यातही टिकणे गरजेचे आहे, असे सर्व फायद्याचे गणित सरांच्या डोक्यात होते, असे या नेत्याचे म्हणणे आहे.