आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिली जेनेरिक मोबाइल औषधपेढी मुंबईत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशात जेनेरिक औषधांचा वापर वाढावा म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातही ३०० जेनेरिक औषधांची दुकाने सुरू केली जाणार आहेत. या दुकानांसोबतच मुंबईकरांच्या मदतीला मोबाइल जेनेरिक औषधपेढीही धावणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या योजनेस केंद्रीय रसायन आणि उत्पादनमंत्री हंसराज अहिर यांनी मंजुरी दिली असून नव्या वर्षात अशा दोन मोबाइल औषधी पेढ्या मुंबईत सुरू होणार आहेत. देशातील हा पहिलाच प्रयोग असेल.

सुभाष देसाई यांची प्रबोधन संस्थेतर्फे गेल्या काही वर्षांपासून जेनेरिक औषध केंद्र मुंबईत तीन-चार ठिकाणी चालवले जाते. मोबाइल औषधी पेढ्यांबाबत नुकतीच अहिर यांच्यासोबत बैठक झाल्याचे सांगतानाच, या पेढ्यांचा जनतेला खूप फायदा होईल, असे देसाई म्हणाले. प्रबोधन संस्थेच्या जेनेरिक औषध दुकानांचे काम पाहणारे नितीन शिंदे यांनी जेनेरिक मोबाइल औषध पेढीबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यात सगळीकडे जेनेरिक औषधांची दुकाने नसल्याने रुग्णांना स्वस्त दरातील औषधे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आता जनतेपर्यंतच जेनेरिक औषधे घेऊन जाण्याची कल्पना सुभाष देसाई यांनी मांडली. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाचे सचिव महेश झगडे यांच्याकडे जेनेरिक मोबाइल औषधपेढीचा प्रस्ताव पाठवला. त्यांनाही तो आवडला होता; परंतु तत्कालीन केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली नाही. त्यानंतर आता दाेन महिन्यांपूर्वी पुन्हा आम्ही हा प्रस्ताव केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्यासमाेर देसाई यांच्या दालनात दाखवून त्याचे सादरीकरणही केले. केंद्रीय मंत्र्यांना प्रस्ताव आवडल्याने त्यांनी लगेचच त्यास मंजुरी दिली. आता हा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य खात्याकडे पाठवण्यात आला असून तो लवकरच मंजूर होईल.

औषधपेढीसाठी ५० लाखांचा खर्च
मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरासाठी प्रत्येकी एक अशा दोन मोबाइल औषधपेढ्या आम्ही सुरू करणार आहोत. एका औषधपेढीला औषधांसह साधारणत: ५० लाख रुपये खर्च आहे. या मोबाइल औषधपेढीत एक ओपीडी ठेवण्यात येणार असून एक डॉक्टर, फार्मासिस्ट आणि एक सहायक असेल. संपूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या औषधपेढीत सर्व प्रकारची जेनेरिक औषधे ठेवण्यात येणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिस स्टेशन व महापालिकेची परवानगी घेऊन प्रत्येक दिवशी ठरावीक सोसायटीमध्ये ही मोबाइल औषधपेढी जाईल. तेथे नागरिकांना तपासून जेनेरिक औषधे दिली जातील. सुरुवात मुंबईपासून केल्यानंतर राज्यभरात अशा मोबाइल औषधपेढ्या सुरू करण्याची योजना असल्याचेही नितीन शिंदे यांनी सांगितले.