आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First List Of Shivsena Candidated Will Come In Week, Divya Marathi

आठवडाभरात सेनेची यादी जाहीर होणार!, भाजपच्या रणनीतीला उत्तर देण्यासाठी पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपने आपली पहिली यादी 20 ऑगस्टपूर्वी जाहीर करण्याचे ठरवले आहे. महायुतीच्या बैठका अजून बाल्यावस्थेत असतानाच भाजपच्या या रणनीतीला उत्तर देण्यासाठी शिवसेनाही आपली पहिली यादी आठवडाभरात जाहीर करणार असल्याचे समजते. संभाव्य उमेदवारांचे अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागवले होते. हे सर्व अहवाल मातोश्रीवर पोहोचल्याचेही सांगितले जात आहे.

युतीची महायुती झाल्याने रिपाइंसोबत आणखी तीन पक्ष महादेव जानकार यांचा रासप, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना, जागांसाठी वाटेकरी झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या जादूमुळे भाजपच्या खासदारांची संख्या ही 23 असून ती शिवसेनेच्या 18 खासदारांपेक्षा जास्त आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या यशामुळे भाजपने 150 जागा लढवण्याचा निर्धार केला असून शिवसेनेकडून वाढीव जागा कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेना आतापर्यंत 171 जागा आणि भाजप 117 जागा लढवत आलेली आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 171 जागा लढवून फक्त 44 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपला 46 जागांवर विजय प्राप्त झाला होता. त्यामुळे या वेळी जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 20 ऑगस्टपर्यंत आपली पहिली यादी जाहीर करणार असल्याने शिवसेनेनेही आपली पहिली यादी आठवडाभरात जाहीर करण्याचे ठरवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जागांवरील संभावित उमेदवारांचे अहवाल मागवले होते. त्यापैकी जवळ-जवळ सर्व जागांचे अहवाल मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. या अहवालांबाबत लवकरच शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत तेथील उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीत कोणाची नावे जाहीर होतात याकडे सेनेतील पदाधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे.

घटक पक्षाला 20 ते 25 जागाच ?
जागा वाटपाच्या तिढ्याबाबत सूत्रांनी सांगितले, घटक पक्षांनी कितीही जागांची मागणी केलेली असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या वाट्यातील 20 ते 25 जागाच घटक पक्षांच्या वाट्याला येणार आहेत. विशेष म्हणजे स्वाभिमानी 37, राष्ट्रीय समाजवादी पक्ष 30, शिवसंग्राम 15 आणि रिपाइंने 59 जागांची मागणी केलेली आहे. या घटक पक्षांच्या एकूण 141 जागा होतात. त्यापैकी फक्त 20 ते 25 जागांवरच यांची बोळवण केली जाणार आहे.

शिवसेना-भाजपला अधिक जागा नाहीत
महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडे धनगरांची मते आहेत. धनगर आरक्षणावरून सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्याचा फायदा जानकर उठवू पाहत आहेत. जानकर यांची पुणे, नगर, सोलापूर आणि मराठवाड्यातील एक-दोन जिल्ह्यांतच ताकद आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी या ऊस उत्पादन क्षेत्रात आहे. विनायक मेटेंची ताकद बीडच्या बाहेर नाही. त्यामुळे त्यांना जास्त जागा देऊन शिवसेना-भाजप आपल्या पायावर कुºहाड मारू इच्छित नाही, असेही सूत्रांनी सांगितले.