आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या टप्प्यात 69% मतदान; 15 जि.प, 165 पंचायत समित्यांसाठी उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर तालुक्यातील आदर्श मतदान केंद्र. अपंगासाठी खुर्ची, रांगोळी काढून, साखर देऊन मतदारांचे स्वागत. - Divya Marathi
लातूर तालुक्यातील आदर्श मतदान केंद्र. अपंगासाठी खुर्ची, रांगोळी काढून, साखर देऊन मतदारांचे स्वागत.
मुंबई - मराठवाड्यातील अाठ जिल्ह्यांसह राज्यातील १५ जिल्हा परिषदा व १६५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान  झाले. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ६९ टक्के मतदान झाले असून काही ठिकाणी सायंकाळी ६ नंतरही मतदारांच्या रांगा होत्या. मराठवाड्यात १३ गावांतील गावकऱ्यांनी विविध कारणांवरून मतदानावर बहिष्कार टाकला. दरम्यान, सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. 
 
जिल्हानिहाय मतदान
अहमदनगर 70.83%
औरंगाबाद 66.22 %
बीड 68.73 %
बुलडाणा 67.31 %
चंद्रपूर 71.75 %
गडचिरोली 71.45 %
हिंगोली 72.49 %
जळगाव 64.14 %
जालना 74.80 %
लातूर 70.31 %
नांदेड 71.69 %
उस्मानाबाद 71.94 %
परभणी 74.94 %
वर्धा 64.93 %
यवतमाळ 70 %
एकूण सरासरी 69%
 
- या १५ जिल्हा परिषदांतर्गतच्या १६५ पंचायत समित्यांच्या १ हजार ७१२ जागांसाठी ७,७०० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर २ कोटी ४ लाख ४ हजार मतदार  होते.
- मतमाेजणी अाणि निकाल २३ फेब्रुवारी राेजी जाहीर हाेणार.
 
नगरमधील पांगरमलच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; दिवसभरात 0% मतदान
पांगरमल (ता. नगर) येथे बनावट दारूमुळे सात जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून निषेध केला. त्यामुळे गावातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच शुकशुकाट होता. दिवसभरात मतदानाचा टक्का शून्य राहिला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी देण्यात आलेल्या स्थानिक उमेदवाराकडील मेजवानीतील दारूमुळे पांगरमल येथील सहा व तेथून दोन किलोमीटरवरील शिंगवे केशव येथील एक असे सात जणांचे बळी गेले आहेत. सातव्या व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा कायम राहिली.

या घटनेच्या निषेधार्थ पांगरमलच्या ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानावर संपूर्ण बहिष्कार घातला.  या गावात एक हजार ७९ मतदान आहे. त्यात पुरुषांचे ५८३, तर महिलांचे मतदान ४९६ आहे. बहिष्काराबाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे व जिल्हा पोलिसप्रमुख सौरभ त्रिपाठी यांनी गावात बैठक घेऊन मतदानावर बहिष्कार न टाकता लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या आवाहनाला न जुमानता  ग्रामस्थ मतदान न करण्यावर ठाम राहिलेे. मतदान केंद्रावर केवळ अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. गावात देखील सर्वत्र शुकशुकाट होता. गावात देखील मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण, ग्रामस्थ मतदान केंद्राकडे फिरकलेही नाहीत.
 
कासारखेड्यात बहिष्कार
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील पिंपळगावराजा जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या कासारखेड येथील वॉर्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थांनी मूलभूत सोयी-सुविधा मिळत नसल्याने आज मतदानावर बहिष्कार टाकला. गावात पिण्याचे पाणी, साफसफाई, रस्ते, नाल्या आदी सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याने कासारखेड ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.

नेकनूर : ५०० नावे झाली यादीतून अचानक गायब
बीडमधील नेकनूर येथे मतदार यादीतून पाचशे मतदारांची नावे गायब झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यापूर्वी मतदारांची नावे यादीत नसल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केली होती. परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही. परळी तालुक्यात गोवर्धन हिवरा येथे सकाळी तांत्रिक कारणामुळे मतदान यंत्र बंद पडले हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...