आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First University Of Security Could Be In Maharashtra

देशातील पहिले सुरक्षाविषयक विद्यापीठ महाराष्ट्रात!, नागपूर, पुण्याची चाचपणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सध्या देशाच्या सुरक्षेला दहशतवादाबराेबरच सायबर क्राइमचाही माेठा धाेका निर्माण झाला अाहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दहशतवादविराेधी व सुरक्षाविषयक अभ्यासक्रमाचा समावेश असलेले स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानुसार एक योजना तयार करण्याचे आदेश गृह विभागाला दिले आहेत. हे विद्यापीठ नागपूर किंवा पुणे येथे स्थापन केले जाणार अाहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील तज्ज्ञांनी मंत्रालयात याबाबत सादरीकरण केल्याची माहिती सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

मुख्यमंत्री कार्यालातील अधिकाऱ्याने याबाबत सांगितले, देशात दहशतवादाचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे. दहशतवाद्यांची संपर्क यंत्रणा अत्याधुनिक आहे. त्यामानाने देशातील सुरक्षा यंत्रणांकडे मागास यंत्रणा आहे. त्यामुळे दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही बसवणे, एनएसजी कमांडोचे प्रशिक्षण केंद्र सुरू करणे यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते मनुष्यबळ पुरविण्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. याचा विचार करून फडणवीस यांनी सुरक्षाविषयक अद्ययावत प्रशिक्षण मिळावे आणि त्यातून आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण व्हावे याचा विचार करून असे सुरक्षा विद्यापीठ स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

विदेशात नाेकरीची संधी
जगात फक्त अमेरिका व इस्रायलमध्येच असे विद्यापीठ आहे. तेथे संकटकाळात संरक्षण विभाग शेवटी कार्यरत होतो आणि पहिल्या फळीत या विद्यापीठातील तज्ज्ञ असतात. रडार हॅकिंगपासून सर्व प्रकारची सुरक्षा ही यंत्रणा सांभाळते. जगात या विषयातील तज्ज्ञांची कमतरता अाहे. भारतात असे कुशल मनुष्यबळ तयार झाल्यास प्रशिक्षित तरुणांना भारतीय लष्करात नाेकरी मिळू शकेल. तसेच परदेशातही चांगल्या नोकरीची संधी अाहे.

काय असेल अभ्यासक्रम ?
या विद्यापीठासाठी सुमारे १०० एकर जागेची आवश्यकता अाहे. तसेच संरक्षण दलाची ठिकाणे जवळ असणेही उचित ठरणार आहे. दहशतवाद्यांची कार्यपद्धती, अमेरिका आणि इस्रायलमधील पोलिसांची कार्यपद्धती, संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाची माहिती आणि त्यांना हॅकिंगपासून रोखण्यासाठीची उपाययोजना, सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून दहशतवादी आणि साइबर क्राइम करणाऱ्यांवर नजर ठेवण्याची पद्धत याबरोबरच कायदेशीर, राजकीय, आर्थिक, सायकॉलॉजी आणि सोशियाेलॉजीचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जगातील सर्व राजकीय पक्षांच्या ध्येयधोरणाचा अभ्यासही या ठिकाणी शिकवला जाणार आहे.