आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fish Dies When Out Of Water, No Death Due To Slaughter: Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मासे आपोआप मरतात, म्हणून बंदी नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत मांसाहाराचे शौकीन आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मांस विक्रीवरील बंदी दोन दिवसांनी घटवण्यात आली आहे. आता १३ आणि १८ सप्टेंबरला मांस विक्रीवर बंदी असणार नाही. बंदीच्या विरोधात दाखल अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. युक्तिवादादरम्यान न्यायमूर्ती अनूप मोहता आणि अमजद सय्यद यांनी सरकार आणि स्थानिक प्रशासनावर अनेक तार्किक प्रश्नांची सरबत्ती केली.
‘मांसावर बंदी घातली, पण मासे,सी-फूड, फ्रोजन मटण आणि अंड्यांवर बंदी का घातली नाही, त्यांना मारले जात नाही का?’ असा प्रश्न न्यायालयाने विचारला. त्यावर उत्तर देताना महाधिवक्ता अनिल सिंह म्हणाले, ‘मटण आणि माशांत फरक आहे. पाण्यातून बाहेर काढताच मासे मरतात, त्यांना कापून मारले जात नाही.’ एकीकडे अहिंसेच्या गोष्टी करता, पण कत्तल आणि मांसविक्रीवर काही दिवस बंदी व उर्वरित दिवस बंदी नाही, हे कसे? फक्त एक दिवसच अशी भावना मनात येते व दुसऱ्या दिवशी ती जाते, असे कसे? या न्यायालयाच्या प्रश्नावर सरकारी वकील निरुत्तर झाले.

न्यायालयाचा प्रश्न होता, ‘मटण विक्री कशी रोखणार? पोलिस, महापालिकेचे अधिकारी घरोघरी जाऊन तशी खात्री करून घेणार का?’ त्यावर उत्तर मिळाले, ‘आम्ही लोकांच्या स्वयंपाकघरात जाऊन त्यांना रोखणार नाही. बंदी फक्त कत्तल आणि विक्रीवर आहे. खाण्यावर नाही.’ त्यावर न्यायालयाने, ‘मुंबई हे महानगर आहे. येथे अशी कुठलीही बंदी घातली जाऊ शकत नाही. या शहराचे अनेक चेहरे आहेत. त्यामुळे आपल्याला दृष्टिकोन बदलावा लागेल,’ अशी टिप्पणी केली.
मांसविक्रीवरील दोन दिवसांची बंदी मागे
जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वानिमित्त मुंबईत मांस विक्रीवर दोन दिवस घालण्यात आलेली बंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. या बंदीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व शुक्रवारपासून सुरू झाले. त्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगर पालिकेने १३ आणि १८ सप्टेंबर रोजी मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर प्रचंड टीका झाल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. परंतु भाजप सरकारने राज्यात स्वतंत्रपणे दोन दिवस मांस विक्रीवर घातलेली बंदी मात्र कायम आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने विशेष सभा घेऊन मांस विक्रीवरील बंदीचा निर्णय मागे घेतला, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातही महापालिकेने बंदी मागे घेतल्याची माहिती दिली. आता यावर सोमवारी उच्च न्यायालय निर्णय देणार आहे.
मनसेने या निर्णयाचे स्वागत केले असून राज्य सरकारने घातलेली बंदी मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. आमचा बंदीच्या कालावधीला विरोध नाही तर लोकांनी काय खावे यापासून त्यांना रोखण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आमचा विरोध आहे, असे ते म्हणाले.

पुढील स्‍लाइडवर वाचा छत्तीसगड चौथे राज्य, ९ दिवसांची बंदी