आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Thousand Crores Scam In Slum Rehabilitation Centre

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पाच हजार कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई एअरपोर्ट झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत दोन खासगी कंपन्यांना 5 हजार कोटी रुपयांचा टीडीआर बेकायदेशीरपणेदिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी केला.


मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्‍ट्रीय विमानतळाचे आधुनिकीकरण करण्यासाठी जीव्हीके आणि एचडीआयएल या दोन खासगी कंपन्यांशी 2006 मध्ये करार करण्यात आले होते. विमानतळाच्या जागेत अतिक्रमण असलेल्या 27 हजार 561 झोपड्यांचे इतरत्र पुनर्वसन करण्याची जबाबदारी या कंपन्यांवर होती.


संबंधित कंपन्यांनी आजपर्यंत केवळ 644 कुटुंबांचे पुनर्वसन केले. परंतु, पुनर्वसन झाल्याची खात्री न करताच एचडीआयएल कंपनीला 11 लाख चौ. मी. टीडीआर मुक्तकरण्यात आला. तसेच जीव्हीके कंपनीला 1. 2 कोटी चौ. फूट चटई क्षेत्र निर्देशांक सुपूर्द करण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला.


विद्याविहार (घाटकोपर) परिसरात बांधकामाचे दर चढे आहेत. या दोन्ही कंपन्यांवर शासनाने टीडीआर आणि चटई क्षेत्र निर्देशांकांची खैरात केली. त्यामुळे या कंपन्यांना 5 हजार कोटीचा नफा कमावता आला. कंपन्यांना चटई क्षेत्र निर्देशांक आणि टीडीआर आंधळेणाने सुपूर्त करण्यात मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांनी मुख्य भूमिका बजावली. या दोन्ही प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे घोटाळ्याची जबाबदारी चव्हाण यांची आहे, असा सोमय्या यांचा दावा आहे.
5 हजार कोटींच्या एअरपोर्ट झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्याची विशेष चौकशी आयोगामार्फत (एसआयटी) चौकशी करावी. या कंपन्यांकडून नफ्याचे पैसे वसूल करावेत, अन्यथा शासनाला न्यायालयात खेचू असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.


अहमद पटेलांचा दबाव
एअरपोर्ट झोपडपट्टी पुनर्वसनाच्या बेकायदा व्यवहाराला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली. त्याला सोनिया गांधी यांचे खासगी सचिव अहमद पटेल आणि राष्‍ट्रवादीचे केंद्रातील मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा दबाव कारणीभूत होता, असा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला.


याद्यांत गडबड
मुंबईतील स्थानिक मतदारांची नावे नोटीस न देताच याद्यांमधून कमी करण्यात आली असून बांगलादेशी नागरिकांची नावे मोठ्या प्रमाणात घुसवण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.