आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जादूटोणाविरोधी विधेयकात सात वर्षे कारावासाची तरतूद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यपालांच्या संमतीनंतर जादूटोणाविरोधी कायदा राज्यभरात वटहुकुमाच्या माध्यमातून लागू झाला असून त्यामध्ये सहा महिने ते सात वर्षे कारावास आणि पाच हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला त्यातून लक्ष्य करण्यात आलेले नसून अंधश्रद्धांच्या माध्यमातून होणारी लोकांची फसवणूक थांबू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


या कायद्यामुळे भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील. एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल. जिवाला धोका निर्माण होईल किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब करण्यास मनाई करण्यात आली आहे. गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे हेसुद्धा अपराध आहेत.


अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणे, फसविणे, ठकविणे हा गुन्हा असेल, पण केवळ अंगात येणे हा गुन्हा नाही. एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे हा गुन्हा ठरणार आहे. चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण, नग्नावस्थेत धिंडे, व्यवहारांवर बंदी घालणे, भूत पिशाच्चांना आवाहन करून घबराट निर्माण करणे, मृत्यूची भीती घालणे, असे सांगणे याला प्रतिबंध करण्यात आला आहे.


तंत्र मंत्र ठरणार गुन्हा
कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे किंवा त्याऐवजी मंत्र तंत्र-गंडेदोरे असे उपचार करणे, बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे, गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे, स्वत:ला विशेष शक्ती असल्याचे सांगून अथवा गेल्या जन्मी पत्नी, प्रेयसी, प्रियकर होता, असे सांगून लैंगिक संबंध ठेवणे. अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचे आश्वासन देत लैंगिक संबंध, मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर असे प्रकारही गुन्हा ठरतील.