आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flat Selling Not In Square Foot, Compulsary In Meter Government Said To Builder

फ्लॅट विक्री चौरस फूट नव्हे, मीटरने करणे बंधनकारक - बिल्डरांना सरकारचा ‘चाप’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फ्लॅटची विक्री करताना ‘मापात पाप’ करणा-या बिल्डरांवर राज्य सरकारच्या वैधमापन
विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. एकट्या मुंबईतच १०० बिल्डरांना नोटिसा बजावल्या आहेत. भांडुपच्या कमलनाथ युनिव्हर्सलचे चार फ्लॅट सील, तर औरंगाबादच्या सुदर्शन कन्स्ट्रक्शनवर कायदेशीर कारवाई केली. पुणे, नाशिक विभागातही अशी कारवाई
होत आहे.

ग्राहक जाहिरातींना भुलून स्क्वेअर फूट दराने फ्लॅट खरेदी करतात. मात्र वैधमापन विभागाच्या नियमानुसार स्क्वेअर मीटरनेच जागा खरेदी करायला हवी. विशेष म्हणजे प्रत्येक बिल्डरने ३० मीटर मेझरिंग टेपने मोजमाप करूनच ग्राहकांना द्यायला हवी. पण तसे होत नाही. कोर्टकचेरीच्या फे-यांमुळे तक्रारी करण्यास कोणी धजावत नाही. मात्र आधीच सजगता दाखवली तर लाखो रुपये वाचू शकतात आणि बिल्डरांनाही चाप बसेल, अशी माहिती वैधमापन विभागाचे महानिरीक्षक संजय पांडे यांनी दिली.

मुंबईतही नोटिसा : मुंबईत ए.व्ही.व्होसा, कॉडकॉर्न, संकल्पसिद्धी, सहयोग, रेलकॉम, स्कार स्टार, मंत्री रिअॅलिटी, पाम कोर्ट डेव्हलपर्स, गुरू, कनाकिया, जे.पी.इन्फ्रास्ट्रक्चर, व्हॅलेंटाइन, पुष्पक, वाधवा, न्यू मोनरॅच, हॅडसॉन, परफेक्ट, शिरोया, मोनरॅच, इनफिनिटी, मातोश्री, एस, ओमकार, माउली साई, शहा रिटा, जैन, सुयोग्य, कंट्रोल, गोकुळधाम, एकता, रॉयल या बिल्डर्सना स्क्वेअर फुटाने घरांची विक्री केल्याबद्दल नोटीस पाठवण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिले पत्र : बाजारात गेलो तर आपण भाजी बघून घेतो, मापाचे कपडे घेतल्याशिवाय पैसे मोजत नाही. मग लाखोंचे घर घेताना ते मोजून का घेत नाही? यासाठी सरकारने लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. बिल्डर बिल्टअप, सुपर बिल्टअपच्या नावाखाली जागा मारत असताना ग्राहक गुपचुप पैसे देऊन मोकळे होतात. यापुढे अशी फसवणूक होऊ नये म्हणून वैधमापन विभागाचे सक्षमीकरण करण्याची गरज आहे. वैधमापन विभाग, पोलिस व महापालिका यांच्यात समन्वय साधून बिल्डरांवर आणखी धडकपणे कारवाई व्हायला हवी, असे पत्र जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

व्यवहार मीटरमध्येच
ग्राहकांची प्रचलित भाषा चौरस फुटाची असल्याने त्यांना समजण्यासाठी तसे सांगावे लागते, परंतु व्यवहार मात्र चौरस फुटामध्येच केला जातो. नोंदणीचा व्यवहार चौरस मीटरमध्येच होतो. परंतु त्याचे फुटामधील योग्य आकारमान ग्राहकांना सांगितले जाते. यासंबंधात मुंबई क्रेडाईचे सदस्य सचिवालयात भेटून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. औरंगाबाद क्रेडाईचे सदस्य असलेले विकासक नोंदणीचा व्यवहार चौरस मिटरमध्येच करतात.
पापालाल गोयल, अध्यक्ष- क्रेडाई, औरंगाबाद

जागरूक व्हा!
बिल्डरांविरोधात तक्रार करण्यासाठी घाबरू नये. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी ०२२-
२२८८६६६६ किंवा dclmms@yahoo.in या मेलवर तक्रार करावी, असे संजय
पांडे यांनी सांगितले.

ग्राहकांमुळे खटले
ग्राहकांच्या जागरूकतेमुळे भांडुपच्या कमलनाथ युनिव्हर्सल बिल्डर आणि औरंगाबादच्या
सुदर्शन कन्स्ट्रक्शननेही नियम डावलून सहा घरांच्या विक्रीच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर
खटला दाखल झाला आहे.