आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच हजार ‘पाहुण्या’ फ्लेमिंगोंचा प्रवास टिपणार सॅटेलाइट ट्रान्समीटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवडी, माहुल, ठाण्याची खाडी.. अशा असंख्य दलदलीच्या पाणथळ जागी देश-विदेशातील लाखो फ्लेमिंगो (रोहित) दरवर्षी महाराष्ट्रात येतात.
मुंबई, ठाणे परिसरात गर्दी करतात आणि गुलाबी धवल कांतीच्या फ्लेमिंगोची माळ मुंबईच्या आभाळात अगदी फुलून जाते. पक्षीप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण.. ठरावीक दिवसांनंतर हे पक्षी परतीच्या मार्गावर निघतात, तेव्हा ते जातात कुठे, काय करतात, ते काय खातात, नवीन पक्षी जन्माला घालतात, या सार्‍याचा काही थांगपत्ता लागत नाही. मात्र, आता राज्यात येणार्‍या 2 लाख फ्लेमिंगोपैकी 5 हजार पक्षी पकडून त्यांच्या पायात आता पीटीटी (फ्लॅटफॉर्म ट्रान्समीटर टर्मिनल) चिप बसवण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.
या सॅटलाइट ट्रान्समीटर चिपद्वारे रोहितच्या प्रवासाची इत्थंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. रोहित संवर्धनाचा असा प्रयोग प्रथमच महाराष्ट्रात होत असून यापूर्वी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएचएनएस) तामिळनाडूत स्थलांतरित पक्ष्यांचा असा प्रयोग केला होता. या प्रयोगातून परदेशातील वेगवेगळी बदके तसेच कदंब पक्ष्यांचा अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासात हे पक्षी परदेशातून जिवाणू विषाणू सोबत घेऊन भारतात येतात का, ते भारत सोडून गेल्यानंतर कुठे कुठे जातात, ही माहिती मिळवण्यात आली होती. तसाच फ्लेमिंगोंचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
प्रस्ताव 15 हजार चिपचा
आंतरराष्ट्रीय पक्षी संवर्धन क्षेत्रात अभ्यासपूर्ण काम करणार्‍या बीएनएचएसने फ्लेमिंगोंचा प्रवास सॅटलाइट चिपद्वारे टिपण्याच प्रस्ताव राज्याच्या वन मंत्रालयासमोर ठेवला होता. त्याला वनमंत्री पतंगराव कदम यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे फ्लेमिंगो या परदेशी पाहुण्यांचे स्थलांतर भारतीयांना नीटपणे कळेल. बीएचएनएसतर्फे 15 हजार फ्लेमिंगोंना चिप बसवण्याची परवानगी मागण्यात आली होती. पण, नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक विभागाकडून 5 हजार फ्लेमिंगोंवर हा प्रयोग करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
अनेक प्रश्नांची उकल
मुंबईत येणारे बहुतांशी फ्लेमिंगो हे कच्छमधून येतात. ते तिथे सहा महिने राहतात. दक्षिण विभागातही त्यांचा मुक्काम सहा महिनेच असतो. काही फ्लेमिंगो परदेशातूनही येतात. त्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप झाला आहे का, प्रवासात त्यांची शिकार होते का, अशा अनेक प्रश्नांची उकल सॅटेलाइट चिपने होणार आहे.
मोहीम दोन वर्षांची
बीएचएनएसने 24 जानेवारी 2014 ला हा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार फ्लेमिंगोंच्या पायात चिप्स बसवण्यात येईल. दोन वर्षांचा ही प्रकल्प मोहीम असेल. फ्लेमिंगो हे वन कायद्याच्या शेड्युल 4 या गटात येतात. हा सारा प्रयोग होत असताना त्यामुळे पक्ष्यांची काही हानी होणार नाही, याची काळजी घेऊन परवानगी देण्यात आली आहे.

पूर्वी कडी.. आता चिप!
फ्लेमिंगोंच्या सरासरी वजनाचा अभ्यास करून सॅटेलाइट चिप तयार करण्यात येणार आहेत. त्या पक्षाच्या पायात बसवताना त्यांना अडचणीच्या होणार नाहीत, याचीही काळजी घेण्यात येणार आहे. पूर्वी स्थलांतरित पक्ष्यांच्या पायात कड्या बसवून त्यांचा अभ्यास केला जायचा. मात्र या अभ्यासाला र्मयादा यायची. मात्र चिपमुळे पक्ष्यांच्या स्थलांतराचा शास्त्रीय अभ्यास होणार आहे. मुख्य म्हणजे कच्छचे रण किंवा शिवडी, ठाणे खाडीचा अधिवास असलेल्या ठिकाणी अतिक्रमण झालेले नाही, यावरही प्रकाश पडू शकेल, अशी माहिती बीएनएचएसचे जनसंपर्क व्यवस्थापक अतुल साठे यांनी दिली.