आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खादी ग्रामोद्योग विभागाकडून चित्रपट निर्मितीचेही प्रशिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील युवा पिढीला रोजगाराभिमुख कौशल्ये मिळावीत म्हणून राज्य सरकारने वेगळा प्रयोग हाती घेण्याचे ठरवले आहे. देशातील चित्रपटसृष्टीची राजधानी असलेल्या मायानगरीत चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजवर मोजक्याच विद्यार्थ्यांना एफटीआयआयसारख्या नामांकित संस्थेत चित्रपटनिर्मितीची संधी मिळते, परंतु खादी ग्रामोद्योगामार्फत होणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळेमुळे दहावी उत्तीर्ण मुलांनाही या कौशल्याची दारे खुली हाेतील. ६ हजार रुपये शुल्क घेऊन चार दिवसांची ही कार्यशाळा बोरिवलीच्या खादी ग्रामोद्योग केंद्रात २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. मिस इंडिया कुवेत २०१२ आणि न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून फिल्म मेकिंग कोर्स केलेल्या अन्विता सुदर्शन यात मार्गदर्शन करतील.
केंद्र सरकारच्या एफटीआयआयसारख्या नामांकित संस्थेत कठोर निवड परीक्षा आणि प्रक्रियेद्वारे निवड होते. यासाठी किमान १२ वी ते पदवी अशी पात्रता अट असते. मात्र या प्रशिक्षणासाठी केवळ महाराष्ट्रातील युवकांना प्राधान्य दिले जाणार आहे. मुंबईत बॉलीवूड असल्याने मुंबईकडे देशभरातून तरुण येत असतात. मात्र राज्यातीलच तरुणांना चित्रपट क्षेत्राची माहिती मिळावी आणि त्यांना प्रशिक्षण देता यावे यासाठी खादी ग्रामोद्योग विभागाने पुढाकार घेतला आहे. चित्रपटनिर्मितीतज्ज्ञ आणि मिस इंडिया कुवेत अन्विता सुदर्शन यंाची या प्रशिक्षणासाठी निविदा प्रक्रियेद्वारे निवड
झाली आहे.
कोण आहे अन्विता सुदर्शन?
न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमधून फिल्म मेकिंगची डिग्री घेतलेल्या अन्विता सुदर्शन यांनी लंडन अकॅडमी ऑफ म्युझिक अँड ड्रॅमॅटिक आर्टमधून अॅडव्हान्स लेव्हलचे प्रशिक्षण घेतले. जपान, भारत, कुवेत, इंग्लंड आणि अमेरिकेत त्यांचे शालेय शिक्षण झाले असून २०११ मध्ये त्यांनी मिस इंडिया कुवेत किताबही पटकावला. मॉडेलिंगसह त्यांनी ६ लघुपटही तयार केले आहेत.
पटकथालेखन, अभिनयाचेही प्रशिक्षण
चित्रपटनिर्मितीच्या या कार्यशाळेनंतर वर्षभर पटकथालेखन, संपादन, अभिनय आणि सिनेमॅटोग्राफीचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील नामवंत लोक हे प्रशिक्षण देण्यासाठी येणार आहेत.
प्रशिक्षित तरुणांची गरज
चित्रपट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित तरुण हवे आहेत. वेगवेगळ्या विभागांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या क्षेत्राची माहिती व्हावी म्हणून कार्यशाळेने त्याची सुरुवात होत आहे. यासाठी आॅनलाइन अर्ज मागवण्यात येत असून किमान दहावी उत्तीर्ण व इंग्रजी समजणाऱ्या मुलांना यात संधी दिली जाईल. २० जणांची एक तुकडी करण्यात येणार असून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. एका महिन्यात दोन कार्यशाळा घेतल्या जातील. चारही दिवस अन्विता या स्वत: उपस्थित राहतील. d
बातम्या आणखी आहेत...