आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या मूल्यासाठी कलावंतांनी एकत्रित यावे, नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे अावाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘लेखक असो की कलाकार, सामाजिक विषण्णतेवर भाष्य केले की त्यांना सामाजिक सेन्सॉरशिपचा सामना करावाच लागतो. त्यामुळे कवी, लेखक व कलाकारांवर लादल्या जाणाऱ्या सामाजिक सेन्सॉरशिपच्या बेड्या तोडायला हव्यात,’ असे मत ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले. कलाकार समता, मानवी मूल्यांचा विचार करतो आणि मानवी कल्याणासाठी जगतो. पण आपण अजून ८ हजार ६०० जाती बाजूला सारत नाही तर एका मूल्यासाठी कसे एकत्र येणार याचा विचार प्रत्येकाने करावा. पुढील काळात स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी कलाकारांनी एकत्रित येऊन याकरिता पुढाकार घ्यावा,’ असे आवाहनही गज्वी यांनी केले.
पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये मंगळवारी अायाेजित दया पवार स्मृती पुरस्कार वितरण साेहळ्यात अध्यक्षपदावरुन ते बाेलत हाेते. लोककलाकार प्रा. गणेश चंदनशिवे, लेखक, कवी वीरा राठोड आणि छायाचित्रकार सुधारक ओलवे आदींना नाटककार, लेखक जयंत पवार आणि प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गज्वी पुढे म्हणाले की, ‘राजकारण्यांनी अाजवर सर्व जातींतील लोकांना एकत्र न अाणता केवळ त्यांचे राजकारणच केले. म्हणूच कलावंतांना समाजात काही भूमिका मांडव्यात लागतात; पण याच भूमिका मांडताना समाजाकडून मारही खावा लागतो. ज्येष्ठ नाटककार तेंडुलकर यांना ब्राह्मणांनीही मारले आणि जयभीमवाल्यांनीही झोडले. म्हणूनच लेखक, कवी, कलावंतांवर समाजाकडून लादल्या जाणाऱ्या सेन्सॉरशिपच्या बेड्या तोडण्याची अाज गरज आहे.’ जयंत पवार म्हणाले की, ‘आज लेखक कलावंतांपुढे भययुक्त वातावरण आहे. भावना दुखावल्या म्हणून जो कोणी उठताे ताे लेखकाची मानगुटं पकडतो. त्यामुळे शोषितांचे प्रश्न मागे पडत आहेत. लेखकांच्या स्वातंत्र्यावर बाधा येत असून त्यांना भयमुक्त वातावरण देणे आवश्यक आहे.’

पुरस्कार फुलेंना अर्पित : राठाेड
प्रा. गणेश चंदनशिवे म्हणाले, ‘माझ्यासाठी कला ही भांडवल आहे. कलेच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडू शकतो. माझं जगणं, खाणं, पिणं लोककला आहे ही गाठ मनात बांधून मी यापुढे लोककलेची सेवा करत राहील,’ असे सांगत त्यांनी ‘माझी मैना गावावर राहिली’ या अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्याचा मुखडा गात उपस्थितांची मने जिंकली. या पुरस्काराने माझ्यासारख्या नव्या लेखकावर जबाबदारी टाकली असल्याची भावना अाेलवे यांनी व्यक्त केली, तर हा पुरस्कार वंचिताच्या शिक्षणासाठी आयुष्य झिजवणाऱ्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अर्पण करत असल्याचे वीरा राठाेड यांनी जाहीर केले.
छायाचित्र: कवी, लेखक वीरा राठाेड, लोककलाकार प्रा. डाॅ. गणेश चंदनशिवे आणि छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचा मंगळवारी पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार देऊन मुंबईत गाैरव करण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...