आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशनाच्या तयारीसाठी अधिका-यांना भरला दम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधिमंडळाच्या मागील दोन अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची उत्तरे आणि माहिती वेळेवर न मिळाल्याने नवनिर्वाचित फडणवीस सरकारची सभागृहात चांगलीच फजिती झाली होती. अधिवेशनात योग्य माहिती न मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलगिरीही व्यक्त करावी लागली. अाता १३ जुलैपासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनात पुन्हा अशी फजिती होऊ नये म्हणून सर्व विभागांच्या अधिका-यांना अधिवेशनाच्या कामाला प्राधान्य देण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आले आहेत.

अधिवेशन काळात सदस्य विविध मुद्द्यांवर तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना उपस्थित करतात आणि मंत्र्यांना यावर उत्तर द्यावे लागते. मात्र, अनेकदा ऐनवेळी लक्षवेधी वा तारांकित प्रश्नाचे योग्य उत्तर येत नसल्याने अध्यक्षांना प्रश्न वा लक्षवेधी सूचना राखून ठेवावी लागते. एक प्रकारे हा मंत्र्यांचा पराभवच असतो. यापुढे असा प्रसंग येऊ नये असा निर्णय संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी घेतला असल्याची माहिती विधानभवनातील सूत्रांनी दिली.

उत्कृष्ट संसदपटू असलेले भाजपचे ज्येष्ठ नेतेे व सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सरकारची ही मलिन प्रतिमा पुसून काढण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी परिपत्रक काढून अधिवेशन कामकाजाबाबत हयगय चालू राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे नियम आणि काटेकोरपणा त्यामुळे पूर्वी कामकाज गांभीर्याने व्हायचे, जनतेचे प्रश्न सुटायचे, परंतु गेल्या काही वर्षांपासून शासन आणि विधिमंडळातील समन्वयाच्या अभावामुळे हे घडताना दिसत नव्हते. त्यामुळे शासनाने अशा प्रकारे परिपत्रक काढले आहे. लक्षवेधी सूचना आदल्या दिवशी मिळाली. त्यामुळे उत्तर तयार करता आले नाही अशी उत्तरे यापुढे अधिका-यांनी दिलेली चालणार नाही, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

गॅलरीत हजेरी बंधनकारक
तारांकित प्रश्न हा विधिमंडळ कामकाजाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून यासंबंधीची उत्तरे वेळेत विधिमंडळाकडे सादर करावीत, नकारात्मक उत्तरांचे खुलासे तसेच चुकीच्या विभागाकडे प्रश्न गेल्यास तो नेमक्या विभागाच्या सचिवांकडे पाठवल्याबाबत बॅलेट तारखेपूर्वी कळवावे, असे परिपत्रकात सूचित करण्यात आले आहे. विधानसभेतील लक्षवेधी सूचना आणि विधान परिषदेतील ९३ ची निवेदने पुढे न ढकलता वार्षिक अहवाल, विधेयकाची स्वयंस्पष्ट टिपणी, आणि एवढेच नव्हे तर सभागृहाच्या गॅलरीत सचिवांनी उपस्थित राहिलेच पाहिजे, अशा सूचनाही या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

निष्काळजीपणा चालणार नाही
यापूर्वी काही मंत्र्यांनी आपल्या विभागाच्या अधिका-यांनी गॅलरीत उपस्थित राहावे आणि प्रश्न आणि लक्षवेधी सूचनेची उत्तरे वेळेपूर्वी द्यावी, असे आदेश दिले होते, परंतु अधिकारी त्याकडे गांभीर्याने पाहत नव्हते. मात्र आता असा निष्काळजीपणा चालणार नाही, असा दम त्यांना भरण्यात अाला अाहे.