आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Forensic Helps Take For The Investigation Of Gangarape

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामूहिक बलात्कार प्रकरणी ‘फॉरेन्सिक’ची मदत घेणार, सत्यपाल सिंह यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महिला छायाचित्रकारावर सामूहिक बलात्कार करणा-या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मुंबई पोलिस भक्कम पुरावे जमा करत आहेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि गुजरातच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचीही या प्रकरणात मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. उद्यापर्यंत हे तज्ज्ञ मुंबईत पोहोचतील. या खटल्यात कोणतीही उणीव राहू नये. यासाठी भक्कम पुरावे जमा केले जात आहेत, अशी ग्वाही डॉ. सिंह यांनी दिली.


या प्रकरणी दिल्लीमधून रविवारी अटक केलेला पाचवा आरोपी मोहंमद सलीम अन्सारी (27) यास सोमवारी किल्ला न्यायालयाने 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


मोबाइलमध्ये फोटो नाहीत
पाचपैकी तिघा आरोपींकडे मोबाइल होते. त्यातील कासिम बंगाली या मुख्य सूत्रधाराने पीडित तरुणीची छायाचित्रे काढल्याचे सदर तरुणीने सांगितले होते. गुन्ह्याचा गवगवा होताच त्याने मोबाइल विकून टाकला होता मात्र या तीनही मोबाइल पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, त्यामध्ये कोणतेही फोटो नाहीत. सदर छायाचित्र दुस-या मोबाइलवरती पाठवले काय, याची फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून शहानिशा करण्यात येत असल्याचे डॉ. सिंह म्हणाले.


सर्व आरोपी बेरोजगार
या प्रकरणातील पाचही नराधम कोणताही कामधंदा करत नव्हते. एक अशिक्षित असून दोघांचे शिक्षण सातवीपर्यंत तर दोघांचे सहावीपर्यंत झालेले आहे. तिघांच्या वडिलांचे निधन झालेले आहे. तर दोघा आरोपींच्या आई व वडिलांचे छत्र हरपलेले आहे, अशी माहिती तपासात समोर आली.


आरोपी अल्पवयीन नाहीतच
चाँद बाबू सत्तार शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 2011 मध्ये अग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा नोंद झाला होता. त्याचे रेकॉर्ड पोलिसांकडे आहे. त्यानुसार शेख याचे वय 18 वर्षे भरते. त्यामुळे यातील कोणीही आरोपी अल्पवयीन नाही, असा निर्वाळा पोलिस आयुक्तांनी दिला. परंतु, गरज भासली तर शेख याच्या हाडाची चाचणी केली जाईल, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.


222 जागा धोक्याच्या
मुंबई शहरातील धोक्याच्या जागा शोधण्यात आल्या आहेत. त्यांची संख्या 222 इतकी आहे. या जागा ज्यांच्या आहेत, त्यांनी त्या ठिकाणी धोक्याचे बोर्ड लावावे, यासाठी मुंबई पोलिस नोटीस पाठवणार आहेत.


मनोबल उंचावण्याचे प्रयत्न
पीडित तरुणी नियमित आहार घेत आहे. तिची प्रकृती पूर्णपणे सुधारली आहे. मानसोपचार तज्ज्ञ तिचे मनोबल उंचावण्याचे प्रयत्न करत आहेत, असे जसलोक रुग्णालयाने सोमवारच्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे.