आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Cm Ashko Chavan Wife\'s Amita File Nomination For Loksabha

नांदेडमधून अमिता चव्हाणांनी दाखल केला अर्ज, स्वत: अशोक चव्हाण मात्र आग्रही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेसने राज्यातील 27 पैकी 26 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले असले तरी नांदेडचा तिढा सोडविण्यात काँग्रेसला यश आलेले नाही. अर्ज भरण्याची मुदत 24 तासांवर म्हणजेच उद्यापर्यंत असतानाही काँग्रेसचा घोळ सुरुच आहे. आदर्शमध्ये अडकलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी आज अर्ज दाखल केला. ऐनवेळी धावाधाव नको म्हणून ही खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी लोकसभेसाठी खुद्द अशोक चव्हाणच प्रबळ इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेसने त्यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
आपल्यालाच उमेदवारी द्यावी, अशी गळ अशोक चव्हाण यांनी घातली आहे. मात्र, विरोधक यावरून रान पेटवतील काय असा प्रश्न काँग्रेसला सतावत आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या नावाला कोणीच अंतिम करू शकले नाहीत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न सरळ हायकमांडच्या कोर्टात टाकून दिला आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांची ही भूमिका पाहून श्रेष्ठींनीही थोडे आस्ते घेतले आहे. अशोक चव्हाण यांचा मार्ग व्हावा म्हणून विद्यमान खासदार भास्करराव खातगावकर-पाटील यांनी आपले स्वत:हून नाव मागे घेतले तरी पक्षाने कोणाचेही नाव दाखल केले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या समर्थकांत नाराजीचे वातावरण आहे. त्याचमुळे अखेर चव्हाण यांनी अधिक खबरदारी म्हणून आपल्या पत्नीला अर्ज भरण्यास सांगितले. तसेच नांदेडचे पालकमंत्री डी पी सांवत यांनाही अर्ज दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार अमिता चव्हाण व सावंत यांनी आज अर्ज दाखल केले.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण हे स्वत:साठी खूप प्रयत्नशील आहेत. मात्र, हायकमांडने त्यांना अद्याप याबाबत काहीही ठोस आश्वासन दिले नाही. जर आपल्याला तिकीट द्यायचे नसेल तर किमान पत्नी अमिताला तरी संधी द्यावी असे अशोकरावांना वाटत आहे. त्यामुळेच अमितांनी आज अर्ज दाखल केला आहे. हायकमांड आपल्यासह पत्नी अमिताचाही विचार करणार नसेल तर आपले नातेवाईक व निकटवर्तीय पालकमंत्री डी पी सावंत यांना पक्षाने तिकीट द्यावे, असे अशोक चव्हाणांना वाटत आहे. त्याचाच भाग म्हणून आज अमिता व सावंत यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, आज सायंकाळपर्यंत काँग्रेस नांदेडबाबतचा घोळ मिटवेल व उमेदवारी जाहीर करेल असे प्रदेश काँग्रेसकडून कळते आहे.