मुंबई- काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतानिवडीसाठी आज मुंबईत विधानभवनात पक्षाच्या आमदारांची बैठक सुरु झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र
आपण काँग्रेस गटनेते पदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगत माघार घेतली आहे. दिल्लीतील पक्षाचे निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे.
विधीमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच सर्व आमदारांनी पक्षाध्यक्ष
सोनिया गांधी यांना गटनेता निवडीसाठी अधिकार देण्यात आले. या बैठकीला 43 पैकी 39 आमदार उपस्थित आहेत. आता त्यानंतर बैठकीत खर्गे व मोहन प्रकाश हे प्रत्येक आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा करीत आहेत. त्यानंतर याबाबत अहवाल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविण्यात येणार आहे. यानंतर गटनेत्याची निवड जाहीर होणार आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गटनेत्याचे नाव आज रात्रीपर्यंत जाहीर होऊ शकते असे म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवाचे खापर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडण्याची रणनिती आमदारांनी व अशोक चव्हाण यांच्या गटाने केल्यानंतर पृथ्वीबाबांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. चव्हाण यांनी माघार घेतल्याने माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी वनमंत्री डॉय पतंगराव कदम या तिघांत चुरस आहे. पतंगराव कदम यांचे वय पाहता त्यांच्या नावाला आमदारांची पसंती मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे खरी चुरस थोरात-विखे-पाटलांत होणार आहे. पृथ्वीबाबा यांनी थोरात यांच्या पारड्यात वजन टाकल्याने त्यांची निवड होऊ शकते. तर, आमदारांच्या म्हणण्यानुसार निवड झाल्यास विखे पाटील बाजी मारतील असे चित्र आहे.
पुढे वाचा, 43 पैकी 32 आमदारांचा पृथ्वीबाबांना विरोध, म्हणूनच घेतली माघार...