आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाला नव्हे भास्कर जाधवांना विरोध, गुहागरमधून लढणार नाही- निलेश राणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्रकार परिषदेत बोलताना निलेश राणे)
मुंबई- कोकणातील गुहागार विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री भास्करराव जाधव यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढविण्याचा आपला निर्णय आपण मागे घेत आहोत असे काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. आपला कोणत्याही पक्षाला विरोध नसून, व्यक्तीविरोध असल्याचे सांगत भास्कर जाधवांच्याविरोधात काम करणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या जाहीर केले.
निलेश राणे आज दुपारी मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. निलेश राणे म्हणाले, आपण आपला निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेत आहोत. राणेंसाहेबांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच आमचे लक्ष्य भाजप-शिवसेनेला पराभूत करण्याचे असल्याने हा निर्णय घेत आहे. राणेंसाहेबांना आघाडीत बिघाडी होऊ नये असे वाटत आहे. साहेबांना कोणताही त्रास होऊ नये यासाठीच आपण हे पाऊल उचलल्याचे सांगितले. आपण कोणत्याही पक्षाविरोधात नाही. राष्ट्रवादीच्या तर अजिबात नाही. मात्र काही व्यक्तींच्याविरोधात आपण संघर्ष करणार आहोत. लोकसभेला आघाडी असताना व भास्कर जाधव प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या प्रचाराला आले नाहीत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आले मग भास्कर का आले नाहीत?. भास्कर जाधव यांच्यामागे कोणाचा तरी हात आहे म्हणूनच ते आपल्या प्रचाराला आले नाहीत. लोकसभेत आपला पराभव होण्यासाठी राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रातांध्यक्ष असलेले भास्कर जाधव, आमदार दीपक केसरकर, आमदार विजय सावंत यांनी शिवसेनेला मदत केली. त्यामुळे या लोकांना धडा शिकविल्याशिवाय आपण राहणार नाही असे निलेश राणेंनी सांगितले.
मागील आठवड्यात उद्योगमंत्री नारायण राणेंचे चिरंजीव व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार निलेश राणेंनी गुहागार विधानसभा मतदारसंघातून कामगारमंत्री भास्करराव जाधव यांच्याविरोधात अपक्ष निवडणूत लढविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनीही राणेंपुत्रांना इशारा दिला होता. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. पक्षापेक्षा कोणी मोठा नाही. पक्ष घेईल तोच अंतिम निर्णय राहील असे सांगत काँग्रेसचे खासदार राहिलेल्या निलेश राणेंना चांगलाच दणका दिला होता. याचबरोबर काँग्रेसमधूनही राणेंना धीराने, संयमाने घेण्यास सांगून मुलांना आवरावे असे सांगितले होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. त्याचबरोबर राणेंना विधानसभा निवडणूक प्रचारसमितीचे प्रमुखपद दिल्याने राणेंवरची जबाबदारी वाढली आहे. अशा परिस्थितीत आघाडीत चुकीचा संदेश जाईल असे पाऊल उचलले जाऊ नये अशा काँग्रेसकडून राणेंना सूचना देण्यात आल्या. निलेश राणे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. त्यांनी आता काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढवली आहे. अशा स्थितीत अपक्ष निवडणूक लढविल्यास राष्ट्रवादीही असे अपक्ष उमेदवार उभे करील अशी भीती काँग्रेसमधून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर राणेंना यात तत्काळ हस्तक्षेप करण्यास सांगितले. त्यानुसार राणेंनी मुलगा निलेशला सांगून निर्णय फिरवण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज निलेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन गुहागारमधून अपक्ष निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, आपण भास्कर जाधवांविरोधात काम करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.