मुंबई/तासगाव- माजी गृहमंत्री व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार आर आर पाटील यांच्या प्रकृतीबाबत गेल्या दोन दिवसापासून अफवा पसरवल्या जात असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांची कन्या स्मिता पाटील यांनी माहिती दिली आहे.
आबांवर मुंबईत उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे. काही उपचार बाकी आहेत त्यामुळे ते पूर्ण केल्यानंतर लवकरच ते सार्वजनिक जीवनात वावरतील असेही स्मिता यांनी सांगितले. आबांच्या प्रकृतीबाबत कोणी काहीही अफवा पसरवल्या तरी कार्यकर्त्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही स्मिता यांनी केले आहे.
माजी गृहमंत्री आबांवर सध्या मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचार सुरु आहेत. याआधी त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रूग्णालयात जबड्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती यशस्वी झाली आहे. मात्र, त्यानंतर आबांना इतर काही ह्दयविकाराचा त्रास लागला होता. त्यामुळे तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार ते सध्या मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचार घेत आहेत. डिसेंबरमध्ये त्यांच्यावर अॅन्जिवोग्राफी करण्यात आली आहे.
मात्र, मागील दोन-चार दिवसापासून आबांच्या तासगावात त्यांच्या आजारपणाबद्दल काही लोक खोडसाळ अफवा पसरवित आहेत. त्यामुळे आबांना मानणारे व त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक त्यांच्या घरी धडकत आहेत. त्यामुळे स्मिता पाटील व तासगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हणमंतराव देसाई यांनी पुढे येत कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.
आर आर पाटील यांच्या जबड्यावर नोव्हेंबर महिन्यात ब्रीच कॅण्डी रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. काही दिवस विश्रांती घेऊन ते सार्वजनिक जीवनात वावरतील, तसेच नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात ते सहभाग घेतील असे पक्षाच्यावतीने सांगितले होते. मात्र, आबा अधिवेशनात दिसले नाहीत. तसेच पक्षाच्यावतीनेही काही स्पष्टीकरण दिले नाही. तसेच आबांवर अद्याप उपचारच सुरु असल्याने काहींनी अफवा पसरविणे सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर कन्या स्मिता यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, पक्षाकडून याबाबत कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.