मुंबई- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अखेर जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी मुंबईतील एसीबीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. अजित पवार जलसंपदा मंत्री असताना 12 प्रकल्पांची अवास्तव किंमत वाढविल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. याबाबत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. यासंबंधित एसीबी अजित पवार यांची चौकशी करेल. तसेच इतर सिंचन घोटाळ्याप्रकरणीही पवारांकडे चौकशी केली जाणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही मंगळवारी साडेतीन तास चौकशी एसीबीने केली होती. सिंचन घोटाळा प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो (ACB) ने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. किंवा आपले लेखी म्हणणे पाठविण्यास सांगितले होते. मात्र, एसीबीचे लेखी म्हणण्यावर समाधान झाले नाही. त्यामुळे या दोघांनाही एसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागली हे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी आता पवार-तटकरे यांच्याविरोधातही फास आवळायला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे.