(छायाचित्र : मृत मोहम्मद फजल)
मुंबई- महाराष्ट्र व गोव्याचे माजी राज्यपाल मोहम्मद फजल (वय 93) यांचे गुरूवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. उत्तर प्रदेशातील अलाहाबादमधील त्यांच्या राहत्या घरी रात्री दीड वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऑक्टोबर 2002 ते डिसेंबर 2004 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. त्यापूर्वी 1999 मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती.
इंग्लंडमधील \'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स\'मध्ये शिक्षण घेतलेले व पुढे अर्थतज्ज्ञ म्हणून नावारूपाला आलेल्या फजल यांचा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला होता. अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली होती. अर्थतज्ज्ञ असल्याने 1980 ते 85 या काळात राष्ट्रीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहिले होते.
मुख्यमंत्र्यांना दु:ख- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल मोहम्मद फजल यांच्या निधनामुळे एक हुशार अर्थतज्ञ आणि प्रशासनातील जाणते व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हणतात की, ‘लंडन स्कूल इकॉनॉमिक्स’मधून पदवी घेतलेले मोहम्मद फजल हे आघाडीचे अर्थतज्ञ म्हणून प्रसिध्द होते. नियोजन आयोगावर काम करतांना त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी चांगली कशी बसेल, यासाठी त्यांनी वेळोवेळी तत्कालीन केंद्र सरकारला मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांची कारकीर्द लक्षात राहण्यासारखी होती. त्यांच्याच काळात प्रथमच राजभवन हे सर्व सामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले, राजभवनाच्या परिसरात विविध कार्यक्रमांना आणि उपक्रमांना सुरुवात झाली. राज्यपाल पदासारखे सर्वोच्च पद भूषविताना देखील ते सर्वात मिळून मिसळून वागायचे. आदिवासींच्या कल्याणासंदर्भात ते विशेष रस घेत असत. त्यांच्या जाण्याने कायदा, वित्तीय क्षेत्र आणि राजकारण यातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक
आपण गमावला आहे असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.