आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Maharashtra Home Minister R R Patil Battles For Life

आबांच्या प्रकृतीत सुधारणा, अफवांवर विश्वास ठेवू नका- लीलावती रूग्णालयाचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आघाडीच्या दैनिकांसह पीटीआयने दिल्यानंतर लीलावती रूग्णालयाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आबांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांच्या प्रकृतीवरून अफवा पसरवू नयेत असे लीलावतीतील डॉक्टरांनी म्हटले आहे.
आर आर आबा हे गेल्या दोन दिवसापासून व्हेटिंलेटरवर असून, विविध उपचारांना तो योग्य प्रतिसाद देत नसल्याचे विविध वृत्तांत म्हटले होते. गेल्या महिन्याभरापासून आबा मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचार घेत आहेत. नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या जबड्यांवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्यावर अॅन्जियोग्राफीही करण्यात आली आहे. आबांना तोंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले असून, किमोथेरपी व रॅडेशन उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे आलेल्या वृत्तांत म्हटले होते. मात्र, आता रूग्णालयाने स्पष्टीकरण देत आबांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रविवारी लीलावतीत जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान, आबांच्या प्रकृतीबाबत मागील काही दिवसापासून अफवा पसरवल्या जात असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांची कन्या स्मिता पाटील यांनी शनिवारीच माहिती दिली होती.

आबांवर मुंबईत उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे. काही उपचार बाकी आहेत त्यामुळे ते पूर्ण केल्यानंतर लवकरच ते सार्वजनिक जीवनात वावरतील असेही स्मिता यांनी सांगितले होते. आबांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवल्या तरी कार्यकर्त्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही स्मिता यांनी केले आहे. स्मिता यांच्यापाठोपाठ आता लीलावती रूग्णालयानेही आबांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितल्याने आबांच्या हिंतचिंतकांनी आनंद व्यक्त केला आहे.