मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद बुधवारी सकाळीच सोडणारे भास्कर जाधवांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास राजभवनावर राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आज जाधव यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भास्कर जाधवांना यावेळी कॅबिनेटमंत्री म्हणून घेण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत खाते देण्यात आलेले नाही. तटकरे यांच्याकडे असलेले जलसंपदा खातेच जाधवांकडे सोपविण्यात येईल असे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागताना बुधवारीच संघटनात्मक पातळीवर बदल करून सुरुवात केली आहे. दुसरीकडे, राज्य मंत्रिमंडळाने मराठा आणि मुस्लिम समाजाला कालच अनुक्रमे 16 आणि 5 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ओबीसी चेहरा असलेल्या सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदी बसवले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणा-या भास्कर जाधवांकडे काय जबाबदारी देण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जाधव यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल असेच बोलले जात होते आणि त्याचप्रमाणे घडल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्यांच्याकडे गुरुवारी कोणत्याही खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला नाही. कदाचित ते उद्या जलसंपदा खात्याचा पदभार स्वीकारतील.
छायाचित्र- राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आज जाधव यांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवारही शपथविधीला उपस्थित होते.