मुंबई - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी दिलेल्या एका मुलाखतीतून काँग्रेसला गोत्यात आणले आहे. आदर्श घोटाळ्याच्या तपासात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांची नावे समोर आली होती. मात्र, त्यांच्यावर कारवाई केली असती तर पक्षाला मोठे नुकसान भोगावे लागले असते. त्यामुळे पक्ष विभागला गेला असता. तेव्हा कोणीच यावर काही बोलले नाही आणि मीसुद्धा यावर जास्त बोलू शकलो नाही, असे चव्हाणांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
यावर दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने वक्तव्य केले असून महाराष्ट्रातील निवडणुकीच्या संभाव्य पराभवासाठी आधीपासूनच बहाणा देण्याचा चव्हाण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, भाजपने चव्हाणांच्या या वक्तव्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास : संबंधित मुलाखतीत माझ्या तोंडी जी वाक्ये आहेत, ती माझी नाहीत असा खुलासा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
आपण नेहमीच कायद्यानुसार राज्याचा कारभार केला असून कायद्याच्या कसोटीवर जे खरे उतरेल त्यालाच आपण नेहमी प्राधान्य दिले, असेही चव्हाण म्हणाले.