आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष: दादांचा नकार दानवेंच्या पथ्यावर, मुख्यमंत्रिपदाकडेही लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात पक्षात असंताेष होता. त्यांच्याविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या होत्या. त्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना पर्याय शोधण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष सोपवण्यात यावे यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा अनुकूल होते. पण आता पुन्हा मंत्रिपद सोडून पुन्हा पक्षाची जबाबदारी घेण्यास दादा तयार झाले नाहीत आणि दुसरा कुठलाच पर्याय न उरल्याने दानवेंच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ आपसूकच पडली.
पाणीपुरवठामंत्री बबनराव लाेणीकर यांच्यासह मराठवाडा, विदर्भातील काही आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी दानवेंच्या नावाला जोरदार विरोध केला होता. मर्जीतील जिल्हाध्यक्ष निवडताना दानवेंनी जातीपातीचे राजकारण केल्याचाही आरोप होता. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांचा बंगला दानवेंना राहण्यास दिला होता. पण दोन महिन्यांत या बंगल्यावरून आर्थिक अनियमितता निदर्शनास आल्याने मेहतांनी तो बंगला त्यांच्याकडून परत मागून घेतला. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनीही दानवेंविरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर दानवेंना दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्षपद न देता पर्याय शोधला जात होता. चंद्रकांत पाटील यांनी भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम बरीच वर्षे केल्याने संघटनात्मक जबाबदारीचा मोठा अनुभव त्यांना होता. अमित शहा यांचे विश्वासू म्हणूनही त्यांची अाेळख अाहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाला ते न्याय देतील अशी खात्री शहा यांनी होती. यासाठी त्यांनी शनिवारपर्यंत दादांच्या होकाराची वाट पाहिली. विशेष म्हणजे दादांच्या नावाला मुख्यमंत्री फडणवीसही अनुकूल होते. सहकारमंत्री म्हणून दादांच्या कामांवर फडणवीस फारसे खुश नाहीत. सहकारमंत्री म्हणून त्यांनी परस्पर घेतलेले िनर्णय मुख्यमंत्र्यांना पसंत नव्हते. त्यामुळे दादांना फडणवीसांनी पसंती िदली होती. मात्र, दादा काही मंत्रिपद सोडायला तयार झाले नाहीत. त्यामुळे अमित शहांना पुन्हा दानवेंना संधी देण्याचा निर्णय घ्यावा लागला.
मुख्यमंत्रिपदाकडेही दानवेंचे लक्ष
राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने प्रदेशाध्यक्ष मराठा असावा यावर भाजपचा भर आहे. यासाठी दानवे नाही, तर चंद्रकांतदादा असा पर्याय ठेवण्यात आला होता. पण दादा शर्यतीतून बाहेर पडल्याने दानवेंचा मार्ग आता मोकळा झाला आहे. स्वत: दानवेंनी जिल्हाध्यक्ष नियुक्त करताना मराठा समाजालाच प्राधान्य दिले. ही सारी खेळी त्यांनी भविष्यात मुख्यमंत्रिपद मिळेल यावर लक्ष ठेवून केली. निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस यांना बदलले गेल्यास पहिले नाव आपले असेल, अशी दानवेंची व्यूहरचना आहे.