आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fort, Caves, Warehouse Become Criminal Destinestion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील किल्ले, लेणी, गोदाम बनले गुन्हेगारांचे अड्डे; महिला, पर्यटकांसाठी धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ओसाड मिलच्या जागेवर छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर मुंबईतील असुरक्षित ठिकाणांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शहर व परिसरातील निर्जन किल्ले, लेणी व ओसाड गोदामे हे गुन्हेगारांचे अड्डे बनले असून ही ठिकाणे महिला व पर्यटकांसाठी धोक्याची बनली आहेत.


मुंबईतील शिवडी, माहीम, वरळी, सायन, धारावी व रिवा परिसरात प्राचीन किल्ले, लेणी असून त्यांची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे आहे. मात्र, या वास्तूंच्या संरक्षणासाठी केवळ एक किंवा दोन सुरक्षारक्षकांचीच नियुक्ती करण्यात आलेली असल्याने एवढ्या अवाढव्य परिसरावर देखरेख ठेवणे त्यांना शक्य होत नाही. याचा गैरफायदा घेत काही गुंड प्रवृत्तीचे लोक या भागात आश्रय घेत असल्याचे समोर आले आहे.


अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक पंकज जोशी यांच्या मते, या पुरातन वास्तूंपैकी बहुतेक शहराच्या मध्यभागी असल्या तरी काही निर्जन भागातही आहेत. आणि हेच भाग पर्यटकांसाठी धोकादायक बनत आहेत. पोर्ट ट्रस्टची काही गोदामेही अशीच निर्जन भागात आहेत, त्या ठिकाणी जाण्यास ना चांगले रस्ते आहेत ना लाइट. अशाच ठिकाणी गैरप्रकारांना आश्रय मिळू शकतो. वास्तुविशारद आभा नरीन लांभा यांनीही या प्राचीन वास्तूमध्ये धोका वाढला असल्याचे कबूल केले.


प्रसिद्ध वास्तुविशारद विकास दिलावरी यांच्या मते, मुंबई शहराच्या विकास आराखड्यात या प्राचीन वास्तूंचा विकास करण्याचे नियोजन आहे. तसे झाल्यास या वास्तू पर्यटकांना आकर्षित करतीलच, परंतु येथील सुरक्षाही वाढण्यास मदत होईल.


पुरातत्त्व विभागाकडे निधीचा अभाव
प्राचीन वास्तूंची देखरेखीची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे आहे. यातील बहुतांश विस्तीर्ण वास्तूंच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ एका सुरक्षारक्षकावर आहे. या ठिकाणी आणखी सुरक्षारक्षक नेमणे खर्चिक असल्याने ते टाळले जाते. या विभागाकडे सध्या निधी व मनुष्यबळाची चणचण आहे. त्यामुळे या स्थळांकडे दुर्लक्ष
होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.