आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत 3 सप्टेंबरला सुर्यकांता पाटील, किन्हाळकर, खतगावकरांचा भाजपात प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादीच्या माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील, नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील-खातगावकर यांच्यासह माधव किन्हाळकर हे येत्या 3 रोजी दिल्लीत भाजपात प्रवेश करणार आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत हा प्रवेश दिल्ली दरबारी होणार आहेत. तर, राष्ट्रवादीचे माजी मंत्री बबनराव पाचपुते हे 4 सप्टेंबर रोजी मुंबईत भाजपात प्रवेश करतील. वरील सर्व नेत्यांचे प्रवेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.
हिंगोलीच्या माजी खासदार व शरद पवारांच्या सहकारी राहिलेल्या ज्येष्ठ नेत्या सुर्यकांता पाटील यांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. तसेच शरद पवारांसह अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यावर सडकून टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे भविष्य नसून पवारांनी या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करावे असा सल्लाही पाटील यांनी दिला होता. त्यामुळे त्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता होती. मी राष्ट्रीय पक्षातच प्रवेश करीन असे वक्तव्य केल्याने त्या भाजप किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात होते. मात्र, केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपात जाणे सुर्यकांता पाटील यांनी पसंत केल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे, अशोक चव्हाणांचे मेहुणे व नांदेडचे खासदार भास्करावराव पाटील-खातगावकर हे भाजपात प्रवेश करीत आहे. लोकसभा निवडणुकीत आपले तिकीट कापल्याने खातगावकर नाराज होते. त्यांनी अशोक चव्हाणांच्या कारभारावर उघड तोफ डागली होती. मागील महिन्यात त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. नांदेडचे राष्ट्रवादीचे आणखी एक नेते व अशोक चव्हाणांविरोधात पेड न्यूज प्रकरणात सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतलेले डॉ. माधव किन्हाळकर हे सुद्धा सुर्यकांता पाटील व खतगावकर यांच्यासोबतच भाजपात दिल्लीत प्रवेश करणार आहेत.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनीही भाजपचा रस्ता धरला आहे. अजित पवार नीट वागणूक देत नाहीत अशी तोफ डागून पाचपुते यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. पाचपुते 4 सप्टेंबर रोजी मुंबईत प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील.