आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Seats With BJP Shiv Sena In Legislature Councile Elections

आमदारकीची शर्यत: विधान परिषदेच्या चारही जागा भाजप- शिवसेना युतीकडेच !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधान परिषदेतील रिक्त चार जागांसाठी जानेवारी महिन्याच्या अखेरीस होणा-या निवडणुकीतील सर्वच जागा संख्याबळाच्या आधारावर जिंकणे सत्ताधारी भाजप- शिवसेनेला सहज शक्य आहे. मात्र, त्यासाठी युतीतील दोन सदस्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. कारण चार जागांसाठी निवडणुकीच्या तीन वेगवेगळ्या अधिसूचना जारी झाल्या आहेत. त्यामुळे स्वतंत्र निवडणुका होणार असल्याने त्यात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. चारपैकी शिवसेना व मित्रपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळू
शकते. मात्र, ऐनवेळी भाजपने शिवसेनेसमोर एखादा नवा पर्याय ठेवल्यास या मित्रपक्षांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो.

विधान परिषदेच्या चार जागांसाठी ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे आणि आशिष शेलार विधानसभेवर निवडून आल्यामुळे, तर विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्यामुळे या चार जागा रिक्त झाल्या. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आणि विनायक मेटे यांच्या रिक्त झालेल्या सदस्यत्वाची मुदत २०१६ पर्यंत, आशिष शेलार यांच्या रिक्त झालेल्या सदस्यत्वाची मुदत २०१८ पर्यंत, तर विनोद तावडे यांच्या रिक्त झालेल्या सदस्यत्वाची मुदत २०२० पर्यंत आहे.

यापैकी तावडे आणि शेलार यांच्या रिक्त जागांची मुदत अधिक असल्याने भाजप त्यावर दावा करणार हे उघडच आहे. मेटेंची रिक्त जागा ही मेटेंनाच दिली जाण्याची शक्यता आहे, तर चव्हाण यांची रिक्त झालेली जागा शिवसेनेच्या सुभाष देसाईंसाठी शिवसेनेला हवी आहे. याबाबत सत्ताधारी दाेन्ही पक्षांत प्राथमिक स्तरावरील बोलणी झाली असून भाजपने देसाईंसाठी ही जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याचे शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाईंनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपच्या गोटातही हालचाली सुरू झाल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करून परतले असल्याचे सांगण्यात अाले.

भाजपकडून भंडारी, शायना यांची चर्चा
भाजपच्या वाट्याला येणा-या दोन जागांपैकी एका जागेवर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांचा दावा प्रबळ असून दुसरी जागा शायना एन. सी. यांना दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत पडद्याआडून चांगली कामगिरी केलेले व प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असलेले मराठवाड्यातील सुजितसिंह ठाकूर यांना संधी मिळावी, असा प्रयत्न मुंडे गटाकडून सुरू असल्याचेही कळते. त्यामुळे ठाकूर यांना संधी द्यायची असेल तर तिस-या जागेवरही भाजपने दावा करणे गरजेचे आहे.

देसाईंना ‘वांद्रे’तून लढविण्याचा भाजपकडून आग्रह
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे वांद्रे पूर्व येथील आमदार प्रकाश सावंत यांचे निधन झाले. हा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असून या जागी शिवसेनेचा आमदार हमखास निवडून येतो. त्यामुळे या मतदारसंघातून सुभाष देसाईंना उभे केल्यास ते विधानसभेतून निवडून येऊ शकतात, असा एक मतप्रवाह सध्या भाजपमध्ये आहे. असे झाल्यास भाजपला विधान परिषदेत एक अधिकची जागा मिळेल. या पर्यायाला शिवसेना कसा प्रतिसाद देते यावर पुढच्या बाबी अवलंबून आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे अगोदरच विधान परिषदेतील आमदारांनी मंत्रिपदे पटकावल्याने विधानसभेतले शिवसेना आमदार नाराज आहेत. त्यामुळे देसाई विधानसभेतून निवडून आले तर शिवसेनेतली अंतर्गत नाराजीही कमी होईल, असा मुद्दा भाजपकडून रेटला जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती ‘भोपळा’च
विधान परिषद निवडणुकीसाठी १३ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून शेवटची तारीख २० जानेवारी आहे. २३ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. चारपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्यास ३० जानेवारी रोजी मतदान होईल. प्रत्येक रिक्त जागेसाठी विधानसभा सदस्यांची पहिल्या पसंतीची किमान १४४ मते मिळावी लागतील. एवढी मते फक्त सत्तारूढ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्याकडे आहेत. सत्तारूढ गटाची मते १८५ असून विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसकडे ४२, तर राष्ट्रवादीकडे केवळ ४१ मते आहेत.