आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार हजार बेळगावकरांचा मुंबईत ‘मराठा क्रांती’चा नारा, सीमाप्रश्नात लक्ष घालण्याची विनंती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेली पाच दशकाहून अधिक काळ कर्नाटकात अडकून पडलेल्या २० लाख सीमा वासियांच्या वतीने बेळगावच्या चार हजार कार्यकर्त्यांनी मराठा क्रांती मूक मोर्चात सहभाग नोंदवला. ‘महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आरक्षण मिळावे, यासाठी हजार मैलाची वाट तुडवून आम्ही आलो आहोत, मराठा बांधवांनी सीमावासियांच्या प्रश्नातही लक्ष घालावे’ अशी कळकळीची विनंती मोर्चात त्यांनी केली.

बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजी पाटील, खानपूरचे आमदार अरविंद पाटील, माजी आमदार मनोहर किणीकर तसेच सीमावासीय सकल मराठा मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली ४ हजार सीमाबांधव सकाळी आझाद मैदानात दाखल झाले. ‘संयुक्त महाराष्ट्र झाला पण संपूर्ण महाराष्ट्र अपूर्णच राहिला’, ‘सीमावासियांवर राज्य चालेल ते केवळ महाराष्ट्राचेच’ असे फलक बेळगावकरांच्या हाती झळकत होते.   

आझाद मैदानात दाखल होण्यापूर्वी या सीमावासिय बांधवांनी हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. तसेच अनेक मोर्चेकऱ्यांनी शिवाजी पार्कवर जावून सीमावासियांचे आजन्म पाठिराखे राहिलेले शिवसेनाप्रमुख िदवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. ‘सीमाप्रश्नाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकार म्हणावे तसे लक्ष घालत नाही. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार कर्नाटकची बाजू उचलून धरत असून महाराष्ट्रातील खासदार उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत’, अशी खंत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेताजी जाधव यांनी व्यक्त केली.  

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची सुरुवात बेळगावातून झाली. १०५ हुतात्म्यांपैकी ५ हुतात्मे बेळगावाचे आहेत. मराठा बांधवांच्या आरक्षणाला अामचा पाठिंबा आहे. आता महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी सीमावासियांच्या चळवळीला पाठिंबा द्यावा. त्यासाठी सीमाभागातील कायर्कर्ते या मोर्चात सहभागी झालेत’, असे बेळगावचे माजी नगरसेवक गजानन पाटील म्हणाले. 
 
‘फेब्रुवारी महिन्यात बेळगावात मराठा मोर्चा निघाला होता. त्यात जवळपास १० लाख लोकांचा सहभाग होता. मोर्चा शांततेत काढूनही कर्नाटक सरकारने आयोजकांवर गुन्हे दाखल केले. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही मुंबईतल्या मोर्चात सहभागी झालो आहोत’, असे सकल मराठा मोर्चाचे प्रवक्ते गुणवंत पाटील यांनी सांगितले.  सीमाभागातील कार्यकर्त्यांना मुंबईच्या मोर्चात आणण्यासाठी सुनील मुरकुटे,राजू मोरे, राजू देसाई, दिलीप जाधव, राजु पाटील, विवेक कुट्रे, सागर कोवाडकर , अभिषेक मोरजकर, सुनील जाधव, गणेश दड्डीकर, आर. आय पाटील, कृष्णा उंद्रे, महेश जुवेकर, आर. के पाटील, मनोहर पाटील, बापू भडांगे, संजय मोरे, शिवराज पाटील आदींनी परिश्रम घेतले.   
बातम्या आणखी आहेत...