आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Thousands Crore Fro The Drought Affected Farmers

दुष्काळग्रस्तांना ४ हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव, केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील १५,७४७ गावांत दुष्काळी परिस्थिती असून या गावांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे ४ हजार कोटींची तातडीची मदत मागितली आहे. यापैकी कृषी पिकांसाठी ३,५७८ कोटी, पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी ३१४ कोटी तसेच जनावरांच्या चाऱ्यांसाठी १०९ कोटी आवश्यक आहेत. तीन दिवसांपूर्वी या मदतीचा अहवाल केंद्राकडे पाठवला असून बुधवारपासून केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. ते दुष्काळ जाहीर केलेल्या भागांची पाहणी करणार असून त्यानंतर १५ दिवसांत बैठक होऊन मदतीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

रब्बीची पेरणीही आॅक्टोबरअखेरीस ४३ टक्के झाली असून ५३.११ लाख हेक्टर क्षेत्र प्रभावी झाले आहे. बाधित शेतकऱ्यांचा विचार करूनच साडेतीन हजार कोटींची मदत मागितली आहे.
कृषी पिकांच्या नुकसानीचा विचार करता जिरायतीसाठी प्रती हेक्टर ६८०० रूपये, बागायतीकरिता १३,५०० रू., तर फळबागांसाठी १८ हजार रू. मदत मागण्यात आली आहे. ही मदत जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्रासाठी दिली जाईल, अशी माहिती खडसेंनी िदली.
यावर्षी जून वगळता सर्व महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे व अमरावती या विभागांतील धरणांमध्ये आॅक्टोबर २०१४ मध्ये ७४ टक्के पाणीसाठा होता. मात्र यावर्षी आॅक्टोबरअखेरीस ५३ टक्के पाणीसाठा होता, असे दिसून आले. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात प्रचंड वाढ करावी लागली आहे. मागच्या वर्षी आॅक्टोबरला ६३ टँकर लागले होते, यंदा त्यात दहापटीने वाढ होऊन ६५३ टँकर लागत आहेत. राज्यातील १३,५७१ भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली असून यापैकी ४,१८९ गावांत ३ मीटरने खाली गेल्याची भयाण स्थिती आहे. यामुळे पुढील वर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची भीती खडसे यांनी व्यक्त केली.

तांदळाची टंचाई अफवा
डाळीपाठोपाठ तांदळाची टंचाई असल्याची चर्चा सुरू अाहे. मात्र ही अफवा असल्याचे खडसेंनी स्पष्ट केले. राज्यात तांदळाचे उत्पादन उत्तम असून धान खरेदीलाही सुरुवात झाली आहे. मागच्या वर्षीचा तांदूळ तसेच यंदाचे उत्पादन पाहता टंचाई जाणवार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.