आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉक्सकॉन महाराष्ट्रातून कदापि बाहेर जाणार नाही; फडणवीस यांची स्पष्टोक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फॉक्सकॉन महाराष्ट्रात येण्यास उत्सुक नाही, अशी बातमी कशी आली ठाऊक नाही. कदाचित सचिवांचे वाक्य समजण्यात गल्लत झाली असेल. केंद्र सरकारकडे त्यांनी रिफर्बिशिंगची परवानगी मागितली होती. ती केंद्राने नाकारली असून त्यांना अन्य जे परवाने हवे होते ते केंद्राने दिलेले आहेत.

काही दिवसांपूर्वीच फॉक्सकॉनच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन चर्चा केली होती. नवी मुंबईतील त्यांचे युनिट सुरूदेखील झाले असून फॉक्सकॉन महाराष्ट्रातून बाहेर जाणार असल्याच्या बातम्या खऱ्या नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.

राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या आणि दिवाळीच्या निमित्ताने शनिवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कामावर समाधानी आहात का, त्यांचेही प्रगतिपुस्तक तयार केले का, असे प्रश्न विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, सरकारच्या कारभाराबाबत कायम जागरूक असतो. मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याचे प्रगतिपुस्तक तयार केलेले आहे. प्रत्येक मंत्र्याला त्याच्या खात्यात कोणकोणती कामे करायची आहेत हे आधीच ठरवून दिलेले आहे. कामांची प्रगती कुठवर आली हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक तीन महिन्यांनी प्रत्येक खात्याच्या सचिवांबरोबर बैठक घेऊन कामाचा आढावा घेतो. एखादे काम झाले नसेल तर त्यात काय अडचणी आहेत हे जाणून घेऊन त्या सोडवण्यावर भर दिला जातो. त्यामुळे प्रत्येक खात्यातील कामे वेगाने प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे प्रत्येक मंत्र्याच्या कामावर समाधानी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विभागाबाबत ते म्हणाले, डॉ. दीपक सावंत चांगले काम करत आहेत. कुपोषणाबाबत आपण गंभीर आहोत. कुपोषण रोखण्यासाठी टास्कफोर्स तयार करण्यात आला आहे. आदिवासी मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न सुटण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करणार असून कुपोषणग्रस्त भागांना भेटी देणार असून कुपोषणाची समस्या सोडविण्यात निश्चित यश येईल, असेही ते म्हणाले.

सत्ता हाती घेतली तेव्हा दुष्काळ ही मोठी समस्या समोर होती. राज्यातील शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत असून त्याचा चांगला फायदा दिसत आहे. पीक विम्याअंतर्गत शेतकऱ्यांना ४२०० कोटींची रक्कम देण्यात आली असून चार हजार कोटींचे वाटप झाले आहे. २०० कोटी बाकी आहेत. ही बाकी रक्कम काही शेतकऱ्यांचे बँकेत खाते नसल्याने अन्य काही कारणांमुळे देण्यात आलेली नाही. मात्र, ही रक्कमही लवकरच देण्यात येईल. कर्जमाफी महत्त्वाचा विषय आहे. मात्र, आतापर्यंत कर्जमाफी दिल्याने शेतकऱ्यांचा फायदा होता बँकांचा फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना सक्षम करून त्यांचे क्रेडिट वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

विरोधकांना पुराव्यासह उत्तर
आमच्यादोन वर्षांच्या कालावधीत एकही मोठा घोटाळा झाला नाही. विरोधकांनी काही आरोप केले, परंतु त्यांना पुराव्यासहित उत्तर दिले. एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप असून त्यांच्यावरील आरोपाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल लवकरच येईल आणि एकनाथ खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येतील. एकनाथ खडसे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्यासारखी अनुभवी व्यक्ती मंत्रिमंडळात हवी आहे, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...