आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात फॉक्सकॉनचे भवितव्य अधांतरी; इतर राज्यात जाणार, उद्योगमंत्र्यांची कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चीनची अर्थव्यवस्था कमकुवत होण्याच्या मार्गावर असल्याने तेथील श्रमिकांच्या पगाराची समस्या वाढली आहे. आयफोन आणि आयपॅडची निर्मिती करणाऱ्या फॉक्सकॉनने महाराष्ट्रात उत्पादन कारखाना सुरू करण्याची घोषणा ऑगस्ट २०१५ मध्ये केली. मात्र, दोन वर्षे झाली तरी याबाबत एक इंचही काम पुढे सरकलेले नाही. फॉक्सकॉन आता महाराष्ट्रात कारखाना सुरू करण्याऐवजी इतर राज्यात जात असल्याची माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही फॉक्सकॉनचे काम अजून सुरू झाले नसल्याची कबुली “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

जगभरात लोकप्रिय असलेल्या आयफोन आणि आयपॅडची निर्मिती तैवानची फॉक्सकॉन कंपनी करते. या कंपनीचा चीनमध्ये मोठा कारखाना आहे. मेक इन इंडियामध्ये सहभागी झाल्यानंतर फॉक्सकॉनने भारतात ३२ हजार कोटी रुपये गुंतवण्याची इच्छा दर्शवली. यात महाराष्ट्राने बाजी मारत ऑगस्ट २०१५ मध्ये फॉक्सकॉनबरोबर करार केला. त्यानुसार पुणे येथे कंपनी आपला कारखाना सुरू करणार होती. यासाठी जागाही पाहण्यात आली. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील नवलाख उंब्रे या गावात दीड हजार एकर जमीन राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून घेतली आणि त्यापोटी ६०० कोटी रुपये गुंतवले. मात्र, फॉक्सकॉनला ही जागा पसंत न पडल्याने त्यांनी नवी मुंबईत स्वतःच एक जागा घेतली आणि गेल्या वर्षी तिथे उत्पादन कारखाना सुरू केला जाणार होता. मात्र, काही परवाने बाकी असल्याने कंपनीचे काम सुरू होऊ शकले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये पत्रकारांशी बोलताना फॉक्सकॉन राज्याबाहेर जाणार नाही याची ग्वाही दिली होती. याचदरम्यान फॉक्सकॉन अन्य राज्यात जागा पाहत होती. काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशमधील श्री सिटीमध्ये जागा घेऊन तिथे कारखाना सुरू करण्याचे काम सुरू केले. एवढेच नव्हे तर तिरुपतीच्या जवळही कंपनी जागा पाहत आहे. आंध्र प्रदेश सरकार फॉक्सकॉनला सर्व सोयी-सुविधा देऊ करत आहे.

उद्योग विभागातील सूत्रांनी माहिती देताना सांगितले, महाराष्ट्र सरकारने इज ऑफ डुइंग बिझनेसअंतर्गत फॉक्सकॉनला अनेक सोयी-सुविधा दिल्या होत्या. परंतु त्यांना जशी हवी तशी जागा मिळत नसल्याने ते वैतागले होते. आंध्र प्रदेश, तेलंगणमध्ये त्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त सोयीसुविधा आणि हवी तशी जागा मिळत असल्याने त्यांनी आता महाराष्ट्राचा नाद सोडल्याचे अिधकाऱ्यांनी सांगितले.

अमेरिकेची गळ
फॉक्सकॉनला आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे. ज्या ठिकाणी चांगल्या सुविधा आहेत तेथेच कंपनी जाईल. आम्ही त्यांना सर्व काही देऊ केले आहे. मात्र, त्यांनी अजून काम सुरू केले नाही. केवळ आपल्या देशातील राज्येच नव्हे तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही फॉक्सकॉनने अमेरिकेत यावे, अशी गळ त्यांना घातली आहे. यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु सध्या तरी फॉक्सकॉनचे राज्यातील भवितव्य अधांतरीच आहे. 
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री
बातम्या आणखी आहेत...