आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांचा चीन दौरा, फॉक्सकॉनची राज्यात गुंतवणुकीची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सौरऊर्जेवरील डेटा सर्व्हर स्टोरेजच्या उभारणीसह मोबाईल, टॅब्लेट, टीव्ही इत्यादी क्षेत्रात गुंतवणुकीस फॉक्सकॉन समूह उत्सुक असून मोबाइलमधील हरित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही गुंतवणुकीची कंपनीची तयारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केलेल्या सादरीकरणात फॉक्सफॉनने ही तयारी दर्शवली.

मुख्यमंत्र्यांचे गुरुवारी चेन्गडू विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी चीनचे कौन्सिल जनरल आणि फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून ते झेन्गझाऊकडे रवाना झाले. चीनमध्ये रोजगार निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये फॉक्सकॉन आहे. कंपनीचे अध्यक्ष टेरी गो यांनी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपनीसाठी डेटा सेंटर उभारताना स्थानिक कंपन्यांची मदत घेऊ, असे सांगितले. २०१५ ते२०१७ या कालावधीत करण्यात येणाऱ्या प्रस्तावित गुंतवणुकीचे सादरीकरण कंपनीने मुख्यमंत्र्यांसमोर केले.

फॉक्सकॉनच्या गुंतवणुकीमुळे राज्यात रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले. "मेक इन इंडिया' आणि "मेक इन महाराष्ट्र'च्या दृष्टीने गुंतवणुकीची तयारी दर्शवितानाच पंतप्रधान मोदी यांच्या "स्वच्छ भारत' आणि "डिजिटल इंडिया' या उपक्रमांचीही कंपनीने प्रशंसा केली.

हेनानच्या विकासाचे मॉडेल राज्यातही
हेनानप्रांताचे गव्हर्नर झी फुझान यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र आणि हेनानदरम्यान असलेल्या समान संधींवर या वेळी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राशी सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध मजबूत करण्यावर फुझान यांनी भर दिला. राज्यात विमानतळ परिसरात सोयीसुविधांच्या निर्मितीसाठी हेनान प्रांतातीलविमानतळकेंद्रित विकासाच्या मॉडेलची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी फुझान यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण दिले. त्यांनी चीनच्या उद्योग शिष्टमंडळासह येऊन महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींची पाहणी करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या देवाणघेवाणीमुळे दोन्ही राज्यांमध्ये नवीन नाते तयार होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. महाराष्ट्र आणि हेनान प्रांतामध्ये शहरं आणि राज्य पातळीवर अधिक सहकार्य वाढविणे हा या चर्चेचा गाभा होता. त्याचप्रमाणे नागपूरसह राज्यातील इतर विमानतळांवर हेनानसारखा विकास होऊ शकेल, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...