आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Free Taxi Service For Patient At Mumbai. News In Mumbai

रुग्णसेवेसाठी अभियंत्याचे टॅक्सीचालक व्रत, गंभीर, अत्यवस्थांना मोफत सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- व्रतवैकल्यांचा श्रावण सुरू झाला, पण ही कथा मात्र एका वेगळ्याच व्रतस्थाची आहे. प्रतिष्ठित कंपनीतील हा एक अभियंता...प्रसूती वेदनेने त्याची पत्नी विव्हळत असते. तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी टॅक्सी मिळत नाही. गयावया केल्यावर कैकपट जादा भाडे घेऊन एक रिक्षाचालक तयार होतो. अभियंता विचार करतो.. हाच प्रसंग इतरांच्या आयुष्यात आला तर... बस्स.. मनाने ठरवले आणि लठ्ठ पगाराची नोकरी सोडून विजय ठाकूर चक्क टॅक्सीचालक झाले.

देशातील आघाडीच्या एल अँड टी कंपनीत ३४ वर्षांपूर्वी मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या आणि आज टॅक्सीचालक बनून रुग्णसेवा करणाऱ्या विजय ठाकूर यांची ही कथा आहे. मशाल चित्रपटात पत्नीला रुग्णालयात गयावया करणाऱ्या दिलीपकुमारसारखाच प्रसंग ठाकूर यांच्यावर ओढवला आणि त्यातूनच त्यांना समाजसेवेची ही प्रेरणा झाली. अंधेरीत राहणारे ७३ वर्षीय ठाकूर म्हणतात, मशालमधलाच प्रसंग १९८४ मध्ये प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात घडला. त्याच क्षणी १८ वर्षांची नोकरी सोडून हे काम मी सुरू केले.
मुलाचा मृत्यू, दत्तक मुलगी
समाजसेवेचा हा वसा पाळतानाच ठाकूर यांच्या १९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. दु:खाचा
डोंगर कोसळला. पण या धक्क्यातून सावरत त्यांनी काम सुरूच ठेवले. एक मुलगी दत्तक घेऊन ठाकूर तिचे संगोपन करत आहेत. टॅक्सीसेवाही अखंड सुरूच आहे.
तिप्पट वेतनावर पाणी
उत्पन्न कमी होऊन कुटुंबाची अाबाळ होत असेल या प्रश्नावर ठाकूर म्हणतात, पैसे कितीही कमावले तरी कमीच पडतात. जगण्यासाठी पैसा की पैशासाठी जगणे हे आधी ठरवायचे, मग सगळे सोपे होते. सध्या ठाकूर दरमहा १५ हजार कमावतात. अभियंता म्हणून त्यांचे वेतन या रकमेच्या तिप्पट होते. टॅक्सीवर त्यांनी दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवला आहे.

एक आठवण अशीही
एकदा अंधेरीजवळ एका भीषण कार अपघातात जखमी महिलेच्या मांडीवर सहा महिन्यांचे बाळ होते. कसेबसे त्यांना काढले. रुग्णालयात नेले. महिला वाचू शकली नाही. पुढे काही लोक माझ्याकडे आले. शेट्टीनामक व्यक्तीकडे घेऊन गेले. या शेट्टी नावाच्या व्यक्तीने तिजोरी उघडून हवे तेवढे पैसे घ्यायला मला सांगितले. पण मी पैही घेतली नाही, अशी आठवण ठाकूर सांगतात.