आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Free Training To Muslim Students By Haj Committee.

मुस्लिम विद्यार्थ्यांना आयएएसची संधी, हज हाऊसतर्फे यूपीएससीचे मोफत प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रीय हज समितीमार्फत मुस्लिम विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. निवासी स्वरूपाच्या या प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज १ मे २०१५ पासून सुरू होत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ मे २०१५ पर्यंत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत, असे आवाहन हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अताउर रहमान यांनी केले आहे.

देशातील मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना आयएएस-आयपीएससारख्या मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी केंद्रीय हज समितीमार्फत यूपीएससी पूर्वतयारीसाठी पूर्णवेळ निवासी प्रशिक्षण योजना राबवली जाते. आतापर्यंत प्रशिक्षण घेतलेल्या सलमान ताज पाटील (जि.सोलापूर) व शकील अन्सारी (जि. नंदुरबार) या दोन विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.

प्रशिक्षणासाठी www.hajcommittee.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येतील. पदवीधर मुस्लिम विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी १ मे पासून २५ मे २०१५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र विद्यार्थ्यांना २५ मे ते ५ जून २०१५ दरम्यान त्यांच्या ई-मेलवर ई-ॲडमिट कार्ड पाठवले जाणार आहेत. त्यानंतर ७ जून २०१५ रोजी देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, हैदराबाद, बंगळुरू आणि श्रीनगर या ६ केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. प्रवेश परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची १ व २ ऑगस्ट २०१५ रोजी मुंबईतील हज हाऊस येथे मुलाखत आणि व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाईल. यातून विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल. १ सप्टेंबर २०१५ पासून मुंबईतील हज हाऊस येथे प्रशिक्षण सुरू केले जाईल.

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीतील भोजन खर्चासाठी ४ हजार ३०० रुपये द्यावे लागणार असून निवासव्यवस्था, ग्रंथालय, स्टडी मटेरिअल, संगणक तसेच इंटरनेट इत्यादी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. प्रशिक्षणासाठी देशभरातून जास्तीत जास्त ५० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

अधिक माहितीसीठी ०२२-२२६१२९६९, ०९४२३७०८३९७, ०९८९२८९५८९६. या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहिती www.hajcommittee.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.