आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गारपीटग्रस्तांना सुधारित पद्धतीने नुकसान भरपाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात शेती आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना विशेष मदत व सवलती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या संकटात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती कुटुंबातील कर्ता असल्यास त्याच्या वारसांना अडीच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. यातील दीड लाख रुपये शासन आणि एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येतील. इतर व्यक्तींच्या वारसास दीड लाख रुपयांची मदत दिली जाईल.

पिके आणि शेतजमिनीच्या नुकसानी भरपाईची मर्यादा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. मोठ्या जनावरांच्या नुकसानीबाबत एका जनावरासाठी २५ हजार रुपये, दोन मध्यम जनावरांसाठी प्रत्येकी १० हजारे, दोन लहान जनावरांसाठी प्रत्येकी पाच हजारे, चार लहान जनावरांसाठी प्रत्येकी साडेतीन हजार रुपये मदत देण्यात येणार आहेत. घर उद्ध्वस्त झाल्यास पक्क्या घरासाठी ७० हजार, कच्च्या घरासाठी २५ हजार रुपये, अंशत: उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी १५ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधतेसाठी मुदतवाढ
ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निवडून आल्यापासून सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात चालू वर्षात सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, परंतु पडताळणी समित्यांकडे असलेला कामाचा व्याप पाहता प्रमाणपत्रे वेळेत निकाली काढणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.