मुंबई - मुखेडच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा विचार असून तसा प्रस्ताव राष्ट्रवादीसमोर मांडणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. मुखेडचे भाजप आमदार गोविंद राठोड यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राठोड यांना १ लाख १८,७८१, तर काँग्रेसचे हणमंतराव पाटील यांना ४५,४९० मते होती. राष्ट्रवादीचे रामचंद्र पोळे ११४१ मते घेऊन पाचव्या स्थानी होते. दरम्यान, भविष्यातील निवडणुकांसंबंधी अजित पवारांशी चर्चा झाली आहे. यापुढे दोन्ही काँग्रेसने एकमेकांविरुद्ध उमेदवार द्यायचे नाही, असा प्रस्ताव आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, एकत्र येण्यावर माणिकरावांची आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंशी प्राथमिक चर्चा झाली. मात्र अजून अंतिम रूप आलेले नाही.