आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From 1 February Food Security Starts In State; Sonia Gandhi, Pawar Inaugarates

राज्यात एक फेब्रुवारीपासून अन्नसुरक्षेचे कवच,सोनिया गांधी, पवारांच्या उपस्थितीत 31 रोजी उद्घाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या अन्नसुरक्षा योजनेला राज्यात एक फेब्रुवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. सोनिया गांधी व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे 31 जानेवारी रोजी होणार्‍या कार्यक्रमात या योजनेचे लोकार्पण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अन्नसुरक्षा योजना केंद्राने लागू केल्यानंतर ती राज्यात लगेचच लागू करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा विभागाने केली होती. त्यासाठी सगळी आकडेवारीही गोळा केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अहवाल पाठवण्यात आला परंतु त्यांना वेळ नसल्याने ही योजना रखडली होती. ‘दिव्य मराठी’त याबाबत बातमी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी योजनेस संमती दिली. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुहूर्त शोधण्यात आला. त्यानंतर 26 जानेवारी व आता एक फेब्रुवारी रोजी योजनेचा शुभारंभ करण्याचे ठरवण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनी होणार घोषणा
नवी मुंबईच्या ऐरोली येथील पटनी मैदानावर 31 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्यातील सर्व मंत्रिमहोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधी यांना उपस्थित राहाण्याची विनंती केली असून त्यांनी निमंत्रण स्वीकारले असल्याचेही सांगण्यात येते. या कार्यक्रमात पाच नागरिकांना धान्य देऊन योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना एक पत्र पाठवून प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात या कार्यक्रमाचा उल्लेख करून तसेच प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन ही योजना लागू होत असल्याबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असे सांगितले आहे.
काय आहे योजना ?
राज्याच्या ग्रामीण भागातील 4.70 कोटी आणि शहरी भागातील 2.30 कोटी असे एकूण सात कोटी जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना गहू दोन रुपये किलो, तांदूळ तीन रुपये किलो आणि भरडधान्ये एक रुपया किलोने उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेसाठी कुटंबप्रमुखाचे चित्र असलेल्या अंत्योदय आणि इतर अशा दोन प्रकारच्या बारकोडेड शिधापत्रिका तयार केल्या जात आहेत.
मंत्र्यांकडूनही दुजोरा
अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनीही 31 जानेवारी रोजी नवी मुंबईत होणार्‍या या कार्यक्रमाच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, ‘एक फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परंतु मान्यवर नेत्यांच्या तारखा उपलब्ध न झाल्याने 31 रोजी करण्यात येणार असून एक फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात ही योजना लागू केली जाईल.’