नागपूर- विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावरही राष्ट्रवादी काँग्रेसने दावा करणार असल्याचे विधीमंडळातील पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी आज सकाळी नागपूरात पत्रकारांना सांगितले. विधानसभेत राष्ट्रवादीकडे 45 आमदारांचे संख्याबळ असल्याने हा दावा केल्याचे पवारांनी सांगितले. तसेच पक्षाकडून माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित केले असल्याची माहिती पवार यांनी दिली.
भाजप- शिवसेना यांच्यात युती झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात भविष्यातील गरज म्हणून एकमेकांशी संधान साधण्याच्या हालचाली सोमवारपासून सुरू केल्या आहेत. मात्र, अद्याप त्यांचा यशस्वी बोलणी झाल्याचे या घटनेवरून दिसून येत नाही. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची सोमवारी रात्री बैठक झाली होती. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची पहिलीच संयुक्त बैठक सोमवारी रात्री विधान परिषद उपसभापतींच्या निवासस्थानी पार पडली. काँग्रेस नेत्यांनी या बैठकीला चहा-पानाची बैठक असे नाव दिले असले तरी ती पूर्वनियोजितच होती. काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, गटनेते विखे पाटील तर राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार आणि सुनील तटकरे या वेळी उपस्थित होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधकांमध्ये फाटाफूट असल्याचे चित्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निर्माण झाले आहे. त्याचा फायदा सत्ताधारी उठविण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही काँग्रेसच्या भवितव्याच्या दृष्टीने ही बाब फायदेशीर नाही. त्यामुळे चारही नेत्यांनी रोजच्या रोज एकत्र येऊन पुढच्या दिवसाची रणनीती आखायची असा निर्णय घेतला आहे. रोज रणनीती ठरवून अधिवेशनात एकत्र येण्याचा तसेच सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यायची असे ठरवण्यात आले आहे.
याच बैठकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, अजित पवारांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याने त्यांच्यातील बोलणी फिसटकल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून देखील उभय पक्षांमध्ये तोडगा निघेल असे दोन्ही पक्षातील नेते खासगीत सांगत आहेत. मात्र, कृती वेगळीच होताना दिसत आहे.
आर आर पाटील यांच्यावर मागील पंधरवड्यात जबड्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आबांना शनिवारी ब्रीच कॅण्डी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या ते सांगलीतील घरी विश्रांती घेत आहेत. आठवडा भर विश्रांती घेतल्यानंतर ते सार्वजनिक कार्यत सहभागी होणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र पुढच्या आठवड्यापासून आबा नागपूरात दाखल होतील असे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीने बीडचे नेते तथा गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव सभापतींकडे दिला आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक 28 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद याच पक्षाला मिळणार यात शंका नाही. त्यामुळे इतर ज्येष्ठ नेत्यांना डावलून धनंजयसारख्या युवा व आक्रमक आमदाराची निवड करताना एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे राष्ट्रवादीचे डावपेच आहेत.